ललित पाटील प्रकरणात मोठी अपडेट, दोन पोलिस बडतर्फ
By विवेक भुसे | Updated: November 20, 2023 23:02 IST2023-11-20T23:01:25+5:302023-11-20T23:02:15+5:30
अपर पोलिस आयुक्त अरविंद चावरिया यांनी सोमवारी हे आदेश काढले. नाथाराम काळे आणि अमित जाधव यांची कोर्ट कंपनी म्हणून नेमणूक करण्यात आली होती.

ललित पाटील प्रकरणात मोठी अपडेट, दोन पोलिस बडतर्फ
पुणे : ड्रग्ज माफिया ललित पाटील याला ससून रुग्णालयातून पळून जाण्यास मदत करणार्या व तो पळून गेल्याचा बनाव करणार्या दोघा पोलिस कर्मचार्यांना पोलिस सेवेतून बडतर्फ करण्यात आले आहे.
पोलीस नाईक नाथाराम भरत काळे आणि पोलिस शिपाई अमित सुरेश जाधव अशी बडतर्फ केलेल्या कर्मचार्यांची नावे आहेत. अपर पोलिस आयुक्त अरविंद चावरिया यांनी सोमवारी हे आदेश काढले.
नाथाराम काळे आणि अमित जाधव यांची कोर्ट कंपनी म्हणून नेमणूक करण्यात आली होती. कारागृहातील कैद्यांच्या सुरक्षेसाठी त्यांना ससून रुग्णालयात बंदोबस्तावर नेमण्यात आले होते. ललित पाटील याच्यावर गुन्हा दाखल झाला असतानाही त्याच्यावर लक्ष ठेवले नाही.
ललित पाटील ससून रुग्णालयातून पळून गेला. त्यानंतर पोलिसांनी केलेल्या तपासात या दोघांनी ललित पाटील याला पळून जाण्यास मदत केल्याचे आढळून आले होते. ललित पाठोपाठ काळे हा लेमन ट्रि हॉटेलमध्ये गेल्याचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसून आले होते. यापूर्वीही नाथाराम काळे याने पत्नीच्या मनाविरुद्ध गर्भपात केला होता. याबद्दल वालचंदनगर पोलीस ठाण्यात २०१४ मध्ये गुन्हा दाखल झाला होता. तेव्हा वाहतूक उपायुक्तांनी निलंबित केले होते.
अमित जाधव याने ललित पाटील याला पळून जाण्यास मदत केल्यानंतर विनय आरान्हा याचा चालक दत्तात्रय डोके याच्याशी संपर्क केला होता. दोघेही ससून हॉस्पिटलमधील कॅन्टीनजवळ एकत्रिरित्या घेऊन एकमेकांना टाळी देताना दिसून आले. जाधव हा यापूर्वीही ५९ दिवस विनापरवाना गैरहजर राहिला होता. मुंढवा पोलिस ठाण्यातील गुन्ह्यात २०२२ मध्ये त्याला निलंबित करण्यात आले होते.
ललित पाटील प्रकरणात सहभाग आढळून आल्याने या दोघांना नुकतीच अटक करण्यात आली असून सध्या त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. दोघांमुळे पोलिसांची प्रतिमा मलिन झाल्याने त्यांना पोलिस सेवेतून बडतर्फ करण्यात आले आहे.