घरफोडी करणाऱ्यांना लुटणारे दोन पोलीस कर्मचारी बडतर्फ
By ऑनलाइन लोकमत | Published: September 25, 2019 03:06 PM2019-09-25T15:06:24+5:302019-09-25T15:07:06+5:30
चोरट्यांमध्ये भांडणे सुरु असताना चोरीच्या मालावर डल्ला मारण्याचा प्रकार पोलीस कर्मचाऱ्यांच्या चांगलाच अंगलट आला
पुणे : येरवडा भागात घरफोडी करुन जात असताना दोघा चोरट्यांमध्ये झालेली भांडणे सुरु असताना चोरीच्या मालावर डल्ला मारण्याचा प्रकार कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यातील दोघा पोलीस कर्मचाऱ्यांच्या चांगलाच अंगलट आला आहे़. या दोघांना अपर पोलीस आयुक्त श्रीकांत तरवडे यांनी बडतर्फ केले आहे.पोलीस शिपाई नितीन फकीर शिंदे आणि आकाश बलदेव सिमरे अशी कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यातील या कर्मचाऱ्यांची नावे आहेत.
याबाबतची माहिती अशी, शिंदे आणि सिमरे हे २ फेब्रुवारी २०१९ रोजी रात्रपाळीकरिता बीट मार्शल म्हणून नेमणूकीला होते. रुबी हॉस्पिटलसमोर दोघे भांडणे करीत असल्याची माहिती मिळाल्यावर ते तेथे पोहचले. त्या दोघांनाही ते मंगलदास पोलीस चौकीत घेऊन आले. त्यांची अंगझडती घेतल्यावर त्यांच्याकडे सोन्याचे दागिने मिळाले. त्यांनी त्यांच्या चौकशी करुन वरिष्ठांना सांगण्याऐवजी त्या चोरीच्या मालातील २ सोन्याच्या बांगड्या व पेडंट त्यांनी काढून घेतले. शिंदे याने सिमरे याचा मोबाईल नंबर 'प्रिन्स साहेब' असा एका कागदावर लिहून दिला व काही अडचण आल्यावर फोन करा असे सांगून त्यांना सोडून दिले.
याबाबत येरवडा पोलीस ठाण्यात २ लाख ९९ हजार ५०० रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने व रोख रक्कम चोरीला गेल्याचा गुन्हा दाखल झाला होता. त्याचा तपास करीत असताना पोलीस उपनिरीक्षक रवींद्र गवारी यांनी शाहरुख सलीम शेख (वय १९, रा़ राजीव गांधीनगर, येरवडा) आणि एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले. त्यांनी घरफोडी केल्याचे निष्पन्न झाले. त्यांच्याकडे तपास करीत असताना घरफोडी केल्यानंतर रुबी हॉलसमोर मोटारसायकलवरुन आलेल्या दोघा पोलिसांनी आपल्याकडील दागिने काढून घेऊन मोबाईल क्रमांक देऊन सोडून दिल्याचे त्यांनी सांगितले. आरोपीकडील मोबाईल नंबर हा नितीन शिंदे यांचा असल्याचे निष्पन्न झाले. चोरीतील मालापैकी काही माल त्यांनी घेतल्याचे पुढे आल्यावर त्यांना मुद्देमाल हजर करण्याचा आदेश दिला गेला़ त्यांनी दागिने वितळवून त्याची २७ ग्रॅम वजनाची सोन्याची लगड येरवडा पोलीस ठाण्यात हजर केली. घरफोडीतील आरोपी मिळून आल्यानंतरही त्यांना ताब्यात न घेता व वरिष्ठांना न कळविता त्यांच्याकडून दागिने काढून घेतल्याने दोघांना निलंबित करण्यात आले.
त्यांची विभागीय चौकशी करण्यात आली. आरोपी मिळून आले असताना त्यांच्यावर कारवाई केली असती तर भविष्यात त्यांच्याकडून होणारे गुन्हे रोखता आले असते. तसेच पोलीस दलात केवळ ७ वषार्ची सेवा झालेली असताना दोघांनी केलेले कृत्य हे पोलीस दलास काळीमा फासणारे आहे, अशा या कृत्यामुळेच पोलिसांची प्रतिमा जनमानसांत डागाळण्यास मदत झालेली आहे. त्यामुळे त्यांना शासकीय सेवेतून काढून टाकण्याचा आदेश अपर पोलीस आयुक्त श्रीकांत तरवडे यांनी दिला आहे.