पुणे पोलीस दलातील दोघांनी सर केले ’माऊंट हनुमान तिब्बा’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2021 04:13 AM2021-07-14T04:13:07+5:302021-07-14T04:13:07+5:30
पुणे : कामावर सायकलवर जायचे आणि सिंहगड किल्ला चढण्याचा सराव करायचा. त्यामुळे त्यांचा फिटनेस चांगला झाला आणि म्हणूनच हिमाचल ...
पुणे : कामावर सायकलवर जायचे आणि सिंहगड किल्ला चढण्याचा सराव करायचा. त्यामुळे त्यांचा फिटनेस चांगला झाला आणि म्हणूनच हिमाचल प्रदेशामधील धवलाधार पर्वतरांगेतील सर्वात उंच व अतिशय अवघड मानल्या जाणारे ‘माऊंट हनुमान तिब्बा’ त्यांनी सहजरीत्या ‘सर’ केले. ते आहेत पुणे पोलीस दलातील नाईक स्वप्नील गरड. त्यांच्यासोबत रफीक शेख व शरद कुलकर्णी यांनीदेखील सहभाग घेतला.
५९८२ मीटर उंचीचे हिमशिखर माऊंट हनुमान तिब्बा मोहिमेमध्ये महाराष्ट्रातील ६ गिर्यारोहकांनी सहभाग घेतला होता. त्यात महाराष्ट्र पोलीस दलातील दोघांचा समावेश होता. या माेहिमेसाठी सुरुवात २४ जून २०२१ रोजी मनाली येथून झाली. १ जुलै २०२१ रोजी १०.४५ वाजता स्वप्निल गरड, शरद कुलकर्णी व रफीक शेख यांनी माऊंट हनुमान तिब्बा हे शिखर सर केले. या मोहिमेचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे शरद कुलकर्णी आहेत. त्यांचे वय ५९ आहे. या मोहिमेमध्ये दुर्गप्रेमी गिरिभ्रमण संस्था, पुणेचे गिर्यारोहक पोलीस नाईक स्वप्निल आदिनाथ गरड यांनी प्रयत्न केले.
पहिल्यांदाच पोलीस दलातील दोघांनी शिखर सर केल्याने त्यांचा विविध संस्थांकडून सत्कार करण्यात येत आहे. गरड हे नियमित सायकल चालवतात. ते घरून सायकलवरच ऑफिसला जातात. त्याद्वारे सायकल चालविण्याची जनजागृती ते करतात. पर्यावरण वाचवा हा संदेश देत असतात. स्वप्निल गरड यांचा जगातील सर्वांत उंच माउंट एव्हरेस्ट हे शिखर पुढील वर्षी सर करण्याचा मानस आहे.
————————————-
स्वप्निल गरड म्हणाले की, “मी गेले दोन वर्षांपासून कामावर ये-जात करत आहे. तसेच दैनंदिन कामकाजासाठी सायकलचाच वापर करतो. त्यामुळे माझी तब्येत फिट आहे. आतापर्यंत सुमारे १० हजारहून अधिक प्रवास सायकलवरून केला आहे. त्यामुळे शारीरिक आणि मानसिक तयारी चांगली झाली. राजे शिवाजी क्लायबिंग वॉल, शिवाजीनगर येथे रोज सराव करत होतो. मोहिमेला जाण्याअगोदर एक महिना आधीपासून रोज सकाळी साडेतीन वाजता घरातून सिंहगडावर जायचो. पाठीवर २० ते २२ किलो वजन घेऊन ५५ मिनिटांमध्ये किल्ला सर करायचो आणि ४५ मिनिटांमध्ये उतरायचो.’’
-----------------------
एव्हरेस्टवीर रफीक शेख म्हणाले की, “माऊंट हनुमान तिब्बा या शिखरावरील तांत्रिकदृष्ट्या अतिशय अवघड असा टप्पा माऊंट एव्हरेस्टदेखील नसल्याने ही मोहीम अवघड होती व निसर्गाची साथ लाभल्याने ही मोहीम यशस्वी झाली.’’
--------------------------