बारामतीत दोन दरोडेखोर जेरबंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2021 04:14 AM2021-02-27T04:14:58+5:302021-02-27T04:14:58+5:30
बारामती : ग्रामीण पोलिसांची स्थानिक गुन्हे शाखा आणि वडगाव निंबाळकर पोलिसांनी संयुक्तरित्या मोठी कारवाई केली आहे. पोलिसांनी इंदापूर, ...
बारामती : ग्रामीण पोलिसांची स्थानिक गुन्हे शाखा आणि वडगाव निंबाळकर पोलिसांनी संयुक्तरित्या मोठी कारवाई केली आहे. पोलिसांनी इंदापूर, काटी येथील दरोडा आणि वडगाव निंबाळकर येथील दरोडा, घरफोडी, जबरी चोरी असे चार गुन्हे उघड करीत दोन दरोडेखोरांना जेरबंद केले आहे.
विकास किरण शिंदे (वय २५, रा. नांदल, ता. फलटण, जि. सातारा), रावश्या कोब्या काळे (वय २५, काटी, ता. इंदापूर, जि. पुणे) अशी आरोपींची नावे आहेत. इंदापूर पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यात आरोपीनीं काटी येथे दरोडा टाकताना दरवाज्यावर दगड टाकून घरात प्रवेश केला. फिर्यादी महिला आणि घरात असलेली लहान मुलीला कोयत्याचा धाक दाखवून घरातील सोन्या-चांदीचे दागिने आणि मोबाइल असा एकूण १ लाख ७ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला होता. तसेच वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यातदेखील आरोपींनी कोयत्याचा धाक दाखवून सोन्या-चांदीचे दागिने, २ मोबाइलसह २ लाख १६ हजार रुपयांचा ऐवज लंपास केला.
सर्व गुन्ह्याचा समांतर तपास करीत असताना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सीसीटीव्ही फुटेज तपासले. तसेच रेकॉर्डवरील आरोपींची माहिती घेतली. यावेळी गोपनीय माहितीवरून विकास किरण शिंदे, रावश्या कोब्या काळे यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे चौकशी केली असता वरील दोन्ही ठिकाणचे दरोडे आणि घर फोडी तसेच जबरी चोरीचा गुन्हा आपले इतर साथीदारांमार्फत केल्याचे कबुल केले. दोन्ही आरोपींना वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्याच्या ताब्यात दिले आहे.