बिबट्याच्या हल्ल्यात दोन गार्इंचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2018 02:35 AM2018-06-16T02:35:22+5:302018-06-16T02:35:22+5:30
भोर येथून २७ किलोमीटर अंतरावर असलेल्या रायरेश्वर किल्ल्यावर गेल्या चार दिवसांत बिबट्याच्या हल्ल्यात दोन गायींचा मृत्यू झाला आहे.
भोर - येथून २७ किलोमीटर अंतरावर असलेल्या रायरेश्वर किल्ल्यावर गेल्या चार दिवसांत बिबट्याच्या हल्ल्यात दोन गायींचा मृत्यू झाला आहे. तसेच एका शेतकऱ्याचे खोंडही बेपत्ता आहे. यामुळे या परिसरात दहशतीचे वातावरण आहे. रात्री अपरात्री ग्रामस्थांना बिबट्याचे दिसत असल्याने त्यांनी भीतीपोटी बाहेर पडणेही बंद केले आहे.
या बिबट्याचा बंदोबस्त करण्यासाठी या परिसरात पिंजरा लावण्यात यावा, अशी मागणी येथील ग्रामस्थांनी केली आहे.
रायरेश्वर किल्ल्यावरील कृष्णा बाळू जंगम यांच्या गायी सोमवारी सकाळी तर नामदेव राजाराम जंगम यांची गायी गुरुवारी अशा दोन शेतकºयांच्या गायी रानात चरायला सोडल्या होत्या.
यावेळी बिबट्याने त्यांच्यावर हल्ला करून त्यांना ठार मारले. जर्शी जातीच्या सुमारे २५ हजार रु. किमतीच्या दुभत्या गायी मेल्याने या शेतकºयांचे मोठे नुकसान झाले आहे. येथील शेतकºयांचा दूध व्यवसाय हा प्रमुख जोडधंदा आहे. यामुळे त्यांना चार पैसे मिळतात. जनावरे मेल्याने त्यांच्या उदरनिर्वाहाचे साधन बंद झाले आहे. तर हरिश्चंद्र धोंडिबा जंगम यांचा खोंड बिबट्याने पळवला आहे. तो अद्याप सापडला नाही. त्यामुळे वनविभागाने पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी,अशी मागणी केली आहे.
बिबट्याचा वावर या परिसरात असल्याने नागरिक बाहेर पडण्यास घाबरत आहेत. त्यामुळे वनविभागाने बिबट्याला पकडण्यासाठी या ठिकाणी पिंजरा लावावा, अशी मागणी गोपाळ जंगम, कृष्णा जंगम, नारायण जंगम या शेतकºयांनी केली आहे.
वीज नसल्याने गैरसोय
रायरेश्वर किल्ल्यावर जाणारी लोकंडी शिडी ते मंदिरापर्यंत रात्रीच्या वेळी वीज नसल्याने येणारे पर्यटक आणि किल्ल्यावरील लोकांना रात्री अपरात्री अंधारात बाहेर पडता येत नाही. त्यामुळे या परिसरात विजेची सोय करण्याची मागणी ग्रामपंचायत सदस्य किशोर जंगम यांनी केली आहे.