बारामती तालुक्यात चारचाकीने धडक दिल्याने दोन शालेय विद्यार्थांचा मृत्यू, एक गंभीर
By ऑनलाइन लोकमत | Published: September 4, 2023 01:42 PM2023-09-04T13:42:50+5:302023-09-04T13:43:12+5:30
या अपघातात संस्कार संतोष खांडेकर हा देखील गंभीर जखमी झाला आहे. संस्कार हा पाचवीमध्ये शिकत आहे....
बारामती (पुणे): बारामती-पुणे मार्गावरील जळगाव कडेपठार येथे भरधाव वेगात जाणाऱ्या कारने तीन शालेय विद्यार्थ्याना धडक दिली. सोमवारी (दि. ४) सकाळी सव्वानऊच्या सुमारास हा अपघात झाला. या अपघातात ओंकार संतोष खांडेकर व रुपेश अमोल खांडेकर ही दोन शाळकरी मुले मृत्यूमुखी पडली. ते दोघेही इयत्ता दहावीत शिकत होते. या अपघातात संस्कार संतोष खांडेकर हा देखील गंभीर जखमी झाला आहे. संस्कार हा पाचवीमध्ये शिकत आहे.
आज सकाळी नेहमीप्रमाणे घरुन शाळेमध्ये जाण्यासाठी ही तिन्ही शाळकरी मुले निघाली होती. जळगाव कडेपठार गावामध्ये पुणे-बारामती रस्त्यावर मोरगावकडून बारामतीकडे निघालेल्या ह्युंडाई कंपनीच्या चार चाकीने (गाडी क्रमांक एमएच 24- सी- 8041) शाळेकडे निघालेल्या तिन्ही शाळकरी मुलांना जोरदार धडक दिली. या नंतर मोर्चाच्या पोलिस बंदोबस्तावर असलेल्या प्रवीण वायसे, राहुल पांढरे, विजय वाघमोडे व अमोल राऊत या पोलिस कर्मचा-यांनी त्यांच्याच खाजगी गाडीतून बारामतीतील गावडे हॉस्पिटलमध्ये तिन्ही मुलांना नेले, मात्र त्या पैकी ओंकार खांडेकर व रुपेश खांडेकर यांचा मृत्यू झाला होता. संस्कार यास गिरीराज रुग्णालयाच उपचारासाठी हलविण्यात आले आहे.
या तिन्ही मुलांना कारने पाठीमागून येऊन धडक दिली. त्यानंतर रस्त्याच्या कडेला असलेल्या एका वाहनालाही गाडी जाऊन धडकली. अपघाताबाबत पोलिस अधिक तपास करीत आहेत.