Sidhu Moose Wala: सिद्धू मुसेवाला यांच्या हत्येमागे पुण्याचं कनेक्शन उघड; दोन मोठी नावं आली समोर
By ऑनलाइन लोकमत | Published: June 6, 2022 12:04 PM2022-06-06T12:04:46+5:302022-06-06T13:17:58+5:30
सिद्धू मुसेवाला यांच्या हत्येची जबाबदारी लॉरेन्स बिश्नोईनं स्वीकारली आहे. त्यानंतर आता या प्रकरणात विविध खुलासे समोर येत आहे.
पुणे: प्रसिद्ध पंजाबी गायक आणि काँग्रेस नेते सिद्धू मुसेवाला यांची रविवारी २९ मे रोजी पंजाबमधील मानसा जिल्ह्यात गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. पंजाब सरकारनं सिद्धू मुसेवाला यांची सुरक्षा काढून घेतल्याच्या एका दिवसानंतर त्यांची हत्या करण्यात आली. सिद्धू मुसेवाला यांच्यावर मंगळवारी त्यांच्या मूळ गावी मानसा जिल्ह्यातील मुसा येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी त्यांना निरोप देण्यासाठी मोठ्या संख्येनं गर्दी उसळली होती.
सिद्धू मुसेवाला यांच्या हत्येची जबाबदारी लॉरेन्स बिश्नोईनं स्वीकारली आहे. त्यानंतर आता या प्रकरणात विविध खुलासे समोर येत आहे. सिद्धू मुसेवाला यांची हत्या करण्यासाठी पुण्यातील दोन शूटर्सना पंजाबमध्ये बोलवण्यात आलं होतं, अशी माहिती समोर आली आहे. सदर प्रकरणात ८ लोकांची छायाचित्रं समोर आली होती. त्यापैकी एकाला देहरादूनमधून पकडलं आहे. तर पुण्यातील संतोष जाधव आणि सौरभ महाकाळ या दोन्ही आरोपींविरुद्ध लुकआऊटची नोटीस जारी करण्यात आली आहे.
संतोष जाधव हा आंबेगाव तालुक्यातील पोखरी गावाचा राहणार असून मंचरची त्याची सासुरवाडी आहे. संतोष जाधव हा पुणे ग्रामीण पोलीस दलाच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्यावर मंचर येथील ओंकार बाणखेले यांच्या खून प्रकरणात मोक्का कारवाई करण्यात आली आहे. तेव्हापासून तो फरार आहे.
पुणे- गायक सिद्धू मुसेवाला हत्या प्रकरणातील १० शॉर्प शुटरपैकी दोघे जण पुणे जिल्ह्यातील असल्याची माहिती समोर आहेत.सौरभ महाकाळ आणि संतोष जाधव अशी त्यांची नावं आहेत. pic.twitter.com/l9e7nt59BN
— Lokmat (@lokmat) June 6, 2022
पूर्ववैमनस्यातून सराईत गुन्हेगार ओंकार ऊर्फ राण्या अण्णासाहेब बाणखेले (वय २४, रा. पांढरीमळा, मंचर) याचा १ ऑगस्ट २०२१ रोजी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास एकलहरे गावाजवळ खून करण्यात आला होता. दुचाकीवरुन आलेल्या हल्लेखोरांनी बाणखेले याच्या डोक्यात २ गोळ्याघालून त्याचा खून केला होता. या गुन्ह्यात संतोष जाधव याचे नाव निष्पन्न झाले होते. संतोष जाधव याच्यावर यापूर्वी चोरीचा गुन्हा दाखल होता. ग्रामीण पोलिसांनी याप्रकरणात मोक्का कारवाई केली आहे. त्यानंतर संतोष जाधव हा पुणे परिसरातून दूर हरियाणा, मध्य प्रदेश, राजस्थान भागात गेला असून तेथे त्याने गुन्हेगारी टोळी तयार केल्याचे सांगितले जाते. राजस्थानमधील गंभीर गुन्ह्यामध्ये त्याचा सहभाग असल्याचे उघड झाले होते.
दरम्यान, सिद्धू मुसेवाला यांच्याकडे खाजगी बुलेटप्रूफ वाहन होते, परंतु घटनेच्या वेळी त्यांनी ते सोबत घेतले नव्हते. मूसेवाला यांनी आपले घर सोडल्यानंतर समोरुन २ वाहने आली आणि त्यांनी मूसेवालांच्या गाडीवर अंदाधूंद गोळीबार केला. यादरम्यान २५-३० गोळ्या चालवण्यात आल्या. यातील अनेक गोळ्या मूसेवाला यांच्या शरीरीत घुसल्या. यानंतर रुग्णालयात नेले असता तेथे त्यांना मृत घोषित करण्यात आले.