पुणे गोळीबारः वनराज आंदेकरांच्या हत्येमागे दोन सख्ख्या बहि‍णींचा हात; पोलिसांनी केली अटक

By ऑनलाइन लोकमत | Published: September 2, 2024 12:29 PM2024-09-02T12:29:35+5:302024-09-02T13:15:57+5:30

पुण्यात रविवारी माजी नगरसेवकाची गोळ्या घालून आणि धारदार शस्त्राने हल्ला करुन हत्या करण्यात आल्याने खळबळ उडाली.

Two sisters arrested in NCP Ex corporator Vanraj Andekar murder case | पुणे गोळीबारः वनराज आंदेकरांच्या हत्येमागे दोन सख्ख्या बहि‍णींचा हात; पोलिसांनी केली अटक

पुणे गोळीबारः वनराज आंदेकरांच्या हत्येमागे दोन सख्ख्या बहि‍णींचा हात; पोलिसांनी केली अटक

Vanraj Andekar Murder Case : पुण्यात पुन्हा एकदा गुन्हेगारीने डोकं वर काढल्याने कायदा सुवव्यस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. रविवारी रात्री पुण्यात एका माजी नगरसेवकाची गोळ्या घालून आणि धारदार शस्त्राने हत्या केली. चार ते पाच बाईकवरुन आलेल्या तरुणांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांच्या हल्ला केला. आंदेकर यांच्यावर आरोपींनी पाच गोळ्या चालवल्या आणि त्यानंतर धारदार शस्त्राने हल्ला केला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन तपास सुरु केला. या प्रकरणात आतापर्यंत चार मुख्य आरोपींना अटक करण्यात आली आहे. दरम्यान, भरचौकात हा सगळा प्रकार घडल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालं आहे.

पुण्यात रविवारी माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांच्या हत्येनंतर खळबळ उडाली. याप्रकरणी चार जणांना अटक करण्यात आली आहे. कौटुंबिक आणि वर्चस्वाच्या वादातून वनराज आंदेकर यांची हत्या करण्यात आली. पुणेपोलिसांनी याप्रकरणी त्यांच्या दोन सख्ख्या बहिणी आणि त्यांच्या मेहुण्यांना अटक केली आहे. वनराज यांची पाच गोळ्या झाडून आणि नंतर कोयत्याने वार करत हत्या करण्यात आली. वनराज यांच्या हत्येमागे त्यांच्या कुटुंबियांचाच हात असल्याचे समोर आल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाचा अधिक तपास सुरु केला असून इतर आरोपींचा शोध सुरु आहे. जयंत कोमकर, गणेश कोमकर, संजीवनी कोमकर आणि कल्याणी कोमकर अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.

"रविवारी रात्री समर्थ पोलीस ठाण्याच्या हद्दीत नामदार चौक येथे वनराज आंदेकर आणि त्यांचा चुलत भाऊ उभे होते.  त्यावेळी बाईकरुन आलेल्या आरोपींनी त्यांच्यावर गोळीबार केला आणि धारदार शस्त्राने हल्ला केला. या हल्ल्यानंतर वनराज यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र त्याआधीच वनराज यांचा मृत्यू झाला होता अशी माहिती डॉक्टरांनी दिली. त्यानंतर वनराज यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी ससून रुग्णालयात पाठवण्यात आला. या प्रकरणात आतापर्यंत वनराज यांच्या दोन सख्ख्या बहिणी आणि दोन मेहुण्यांना आरोपी करुन अटक करण्यात आली आहे. इतर आरोपींचा शोध सुरु आहे," अशी माहिती पोलिसांनी दिली. 

नेमकं काय घडलं?

वनराज आंदेकर रविवारी रात्री साडेआठच्या सुमारास नाना पेठेतील डोके तालीम इथे चुलत भावासह थांबले होते. त्यावेळी चार ते पाच बाईकवर आलेल्या आरोपींनी वनराज यांच्या जवळ येऊन गाडी थांबवली आणि थेट गोळीबार सुरु केला.हल्लेखोरांनी वनराज यांच्या दिशेने  पाच ते सहा गोळ्या झाडल्या. त्यानंतर सर्व आरोपी वनराज यांच्या मागे धावले आणि कोयत्याने त्यांच्यावर वार केले. त्यांनतर एका आरोपीने बंदूक दाखवत दहशत माजवण्याचा प्रयत्न केला. या सगळ्या प्रकाराच्या आधी डोके तालीम परिसरातील वीज पुरवठा खंडित झाला होता. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.

Web Title: Two sisters arrested in NCP Ex corporator Vanraj Andekar murder case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.