मिलिटरी कॉलेजमध्ये पूल बांधणीच्या सरावादरम्यान दोन सैनिकांचा मृत्यू , ९ जण जखमी
By ऑनलाइन लोकमत | Published: December 26, 2019 04:42 PM2019-12-26T16:42:40+5:302019-12-26T19:39:01+5:30
युद्धनीतीच्या सरावाचा भाग असलेल्या पूल बांधणीची सुरु होती कसरत
पुणे : दापोडी येथील मिलीटरी इंजिनियरिंग कॉलेजमध्ये पुल बांधणीच्या सरावादरम्यान अचानक पुल कोसळल्यामुळे दोन जवानांचा मृत्यू झाला तर ९ जवान गंभीर जखमी झाले आहेत. यात एका लष्करी अधिका-ाचा समावेश आहे. ही घटना गुरूवारी दुपारी घडली. जखमींना खडकी येथील मिलीटरी हॉस्पिटल आणि पुण्यातील कमांड हॉस्पीटल येथे उपचारासाठी तातडीने हलवीण्यात आले आहे.
लान्स हवालदार पी. के. संजीवन, नायक बी. के. वाघमोडे अशी या अपघातात मृत्यू झालेल्या जवानांची नावे आहेत. तर जखमींची नावे कळू शकली नाहीत. युद्धात आलेले नैसर्गीक आणि कृत्रिम अडथळे दुर करण्यासाठी पुण्यातील कॉलेज ऑफ मिलीटरी इंजिनिअरिंग येथे अधिकाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात येते. गुरुवारी पुल उभारणीचे प्रात्यक्षिके महाविद्यालयात सुरू होती. बेली ब्रीज नामक पुल उभारणीचे काम सुरू असतांना पुलाचा आधार देणारा टॉवर अचानक हलल्यामुळे पूल खाली कोसळला. यावेळी पुलाखाली जवळपास १० ते १२ जवान होते. या पुलाच्या मलब्याखाली अडकलेल्या जवानांना बाहेर काढण्यासाठी तातडीने हालचाली करण्यात आला. लष्करी अधिकाऱ्यांनी पुलाचा राडारोडा बाजुला काढत खाली दबलेल्या जवानांना तातडीने बाहेर काढले.लान्स हवालदार पी. के. संजीवान, नायक बी. के. वाघमोडे या अपघातात गंभीर जखमी झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. तर ९ जवान गंभीर जखमी झाले. जखमींना तातडीने खडकी येथील मिलीटरी हॉस्पीटल आणि पुण्यातील कमांड हॉस्पीटल येथे तातडीने दाखल करण्यात आले. त्यांच्यावर या ठिकाणी उपचार सुरू आहे. यातील काही जनांची प्रकृती चिंताजनक आहे.
मृत आणि जखमींच्या कुटुंबियांना या अपघाता बाबत कळवीण्यात आले आहेत. ही घटना कशी घडली या बाबत चौकशी समिती (कोर्ट ऑफ इन्कॉयरी) स्थापन करण्यात आली असून या समितीचा अहवाल आल्यावर या प्रकरणी दोषी असणाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल अशी माहिती लष्कराच्या सुत्रांनी दिली.
...................
पुल उभारणीचा सुरू होता सराव
युद्धामध्ये शत्रुप्रदेशात अनेक नैसर्गिक आणि कृत्रिम अडथळे येत असतात. एखादी छोटी दरी तसेच नदी ओलांडण्यासाठी लष्कराच्या इंजिनिअरींग विभागातर्फे कृत्रीम पुलाची उभारणी करण्यात येते. या पुलाच्या माध्यमातून अडथळे पार करून वेगाने शत्रुप्रदेशात आत जाता येते. गुरूवारी कॉलेज ऑफ मिलीटरी इंजिनिअरिंग येथे अशा प्रकारण्या पुल उभारणीचा सराव सुरू होता. बेली ब्रिज नामक पुल उभारण्यात येत असतांना या पुलाचा आधारस्तंभ अचानक कोसळल्यामुळे संपूर्ण पुल कोसळला.