केडगावला दोन चिमुकल्यांचा बुडून मृत्यू
By admin | Published: October 24, 2016 01:19 AM2016-10-24T01:19:30+5:302016-10-24T01:19:30+5:30
परिसराला रविवार घातवार ठरला. २ वेगवेगळ्या घटनांमध्ये २ चिमुकल्यांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. पहिली घटना वाखारी येथे घडली
केडगाव : परिसराला रविवार घातवार ठरला. २ वेगवेगळ्या घटनांमध्ये २ चिमुकल्यांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला.
पहिली घटना वाखारी येथे घडली. यात वैभव नामदेव शेळके (वय १३, रा. वाखारी) येथील सिदुराम कोरडे यांच्या विहिरीत पोहायला गेला होता. त्याच्यासोबत २ मुले पोहायला होती. पोहताना त्याला दम लागल्याने त्याचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. ही घटना कळताच ग्रामस्थ जमा झाले. बराच प्रयत्न करूनही वैभवचा मृतदेह बाहेर काढताना अडचणी येत होत्या. कुरकुंभ एमआयडीसीमधील अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी आले. त्यांनाही मृतदेह बाहेर काढण्यात अपयश आले. त्यानंतर आमदार राहुल कुल यांनी एनडीआरएफ येथील आपत्ती व्यवस्थापन कक्षाला संपर्क करून पथक बोलावले. सायंकाळी ६ च्या सुमारास पाणबुडीच्या साह्याने वैभवचा मृतदेह बाहेर काढण्यात यश आले. वैभव हा आंबेगाव येथील स्वामी विवेकानंद विद्यालयात शिकत होता. या वेळी मंडलाधिकारी विजय खारतोडे, पोलीस जितेंद्र पानसरे, शिवाजी मारकड, मनोज शेळके, मधुकर शेळके, सचिन शेळके, पोपट गोरगल, सुनील गोरगल, ईश्वर शेळके उपस्थित होते. दुसरी घटना बोरीपार्धी येथे सकाळी ११ च्या सुमारास घडली. यामध्ये गीता उत्तम कोळी (वय १४, रा. बोरीपार्धी, ता. दौंड) ही बोरीपार्धी स्मशानभूमीशेजारी कालव्यामध्ये अंघोळीसाठी गेली असता पाण्याचा अंदाज न आल्याने तिचा बुडून मृत्यू झाला. दुपारच्या सुमारास ग्रामस्थांनी गीताचा मृतदेह बाहेर काढला. गीताची आई मजुरी करते. वडील नसल्याने कुटुंबातील ती जबाबदार व्यक्ती होती. या घटनेमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे. (वार्ताहर)