दोन विद्यार्थिनींना भरधाव मोटारीने चिरडले, संतप्त जमावाने गाडी पेटवली

By ऑनलाइन लोकमत | Published: October 12, 2017 07:53 PM2017-10-12T19:53:57+5:302017-10-12T19:54:09+5:30

परिक्षा देण्यासाठी निघालेल्या तीन शालेय विद्यार्थीनींना एका भरधाव मोटारीने विरूद्ध दिशेला जावून चिरडले. यात दोघींचा मृत्यू झाला तर  एक जखमी आहे. बारामती मोरगाव रस्त्यावर गुरुवारी (दि. १२) सकाळी साडेसातच्या सुमारास हा अपघात झाला.

Two students were hit by a heavy car, and the angry mob wrecked the car | दोन विद्यार्थिनींना भरधाव मोटारीने चिरडले, संतप्त जमावाने गाडी पेटवली

दोन विद्यार्थिनींना भरधाव मोटारीने चिरडले, संतप्त जमावाने गाडी पेटवली

Next

बारामती : परिक्षा देण्यासाठी निघालेल्या तीन शालेय विद्यार्थीनींना एका भरधाव मोटारीने विरूद्ध दिशेला जावून चिरडले. यात दोघींचा मृत्यू झाला तर  एक जखमी आहे. बारामती मोरगाव रस्त्यावर गुरुवारी (दि. १२) सकाळी साडेसातच्या सुमारास हा अपघात झाला. घटनेनंतर संतप्त जमावाने ती मोटार पेटवली. रास्तारोकोही केला. त्याटमुळे बारामती-पुणे मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. सुमारे ३ किलोमीटरपर्यंतवाहनांच्या दुतर्फा रांगा लागल्या होत्या.  सुमारे अडीच ते तीन तास आंदोलन सुरु होते. पोलिसांनी अन्याय होऊ देणार नाही, आरोपींना अटक करण्यात येईल, असे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.
 ज्या गाडीने अपघात केला ती गाडी शिवसेना शहर प्रमुख पप्पू माने याची असल्याची सर्वत्र चर्चा आहे. मात्र पोलिसांनी सावध भुमिका घेत गाडी नेमकी कुणाची आहे व गाडीत कोण कोण होते, हे तपासाअंती स्पष्ट होईल असे सांगितले. 
अपघातात दिव्या ज्ञानेश्वर पवार ही इयत्ता आठवीतील तर समिक्षा मनोज विटकर ही इयत्ता सातवीतील विद्याथीर्नीचा जागीच मृत्यू झाला. तर पायल संजय पवार ही विद्यार्थीनी किरकोळ जखमी झाली आहे. तिच्यावर बारामती शहरातील कसबा येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. पेटवलेली मोटार जळुन खाक झाली आहे.
अंजनगाव मधील या  विद्यार्थिनी सोमेश्वर विद्यालयात शिकत होत्या. पहिल्या सत्रातील परीक्षेचे पेपर सुरू आहेत. या विद्यार्थिनी परीक्षेसाठी जात होत्या. मोरगावच्या दिशेने भरधाव वेगाने आलेल्या मोटारीने या विद्यार्थिनींना जोरदार धडक दिली. या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले. 
अपघाताच्या ठिकाणी अतिरिक्त पोलीस अधिक्षक डॉ.संदीप पखाले, उपविभागीय पोलीस अधिकारी बापू बांगर, पोलीस निरीक्षक विजय जाधव, सहायक पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, प्रशांत काळे यांनी भेट दिली. तसेच रास्तारोको आंदोलन मागे घेण्याबाबत आंदोलकांशी चर्चा केली. पोलीस तपासात कोठेही मागे राहणार नाही. आरोपींना अटक करण्यात येईल, असे आश्वासन यावेळी अतिरीक्त अधिक्षक पखाले यांनी दिले. त्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. अपघात ठीकाणी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

बचावलेल्या मुलीकडे अधिक चौकशी
 घटनेबाबत अधिक माहिती देताना बारामतीचे उपविभागीय पोलीस अधिकारी बापु बांगर यांनी सांगितले की, मोरगांव मार्गे  इंडीव्हर गाडी बारामतीच्या दिशेने निघाली होती. या गाडीने या विद्यार्थीनीनां चुकीच्या बाजुला जाऊन उडवले. त्यांना धडक देवून गाडीतील इसमांनी गाडीची नंबरप्लेटची तोडफोड करुन पळ काढला. पोलिसांनी त्या मुलींना रुग्णालयात दाखल केले होेते. मात्र, तत्पूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. अपघातातील तिसरी मुलगी सुखरुप आहे. तिच्याकडे अधिक तपास करणार आहेत. घटनेच्या अनुषंगाने सविस्तर तपास करण्याचे काम सुरु आहे. पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत, असे बांगर यांनी सांगितले.

...सोमेश्वर विद्यालयास सुट्टी
अपघातात ठार झालेल्या विद्यार्थिनी अंजनगांव येथील सोमेश्वर विद्यालयात शिक्षण घेत होत्या. आज शाळेत विद्यार्थ्यांचा विज्ञान विषयाचा पेपर होता. अपघाताचे वृत्त समजताच शाळेवर शोककळा पसरली. दोन्ही विद्यार्थिनींना विद्यार्थी, शिक्षकांनी शाळेत श्रध्दांजली वाहिली. मुख्याध्यापक दिलीप साबळे यांनी संस्थेशी संपर्क साधून तातडीने शाळेला सुट्टी जाहीर केली. विज्ञानाचा पेपर शुक्रवारी (दि. १३) दिवशी घेणार असल्याचे सुत्रांनी सांगितले.

...शिक्षणासाठी  ६ किमीची दररोज पायपीट
बारामती-मोरगांव रस्त्यालगत लष्कर वस्ती येथे या विद्यार्थीनी वास्तव्यास आहेत. शाळेपासून सुमारे ३ किमी अंतरावर या विद्यार्थीनींची घरे आहेत. सोमेश्वर विद्यालयात घरुन या विद्यार्थीनी दररोज पायी येत असत. यावेळी शाळेत जाताना कºहा नदीवरील बंधारा पार करुन त्या शाळेत जात असत. शिक्षण घेताना दररोज  येण्या जाण्यासाठी या विद्यार्थीनी सुमारे ६ किलोमीटरची पायपीट करावी लागत असे.

सावधान! अपघाती वळण...वाहन सावकाश चालवा
क-हावागज पासून एक ते दीड किमी अंतरावर हा अपघात झाला अपघाती वळण आहे. या ठिकाणी सार्वजनिक बांधकाम विभागाने फलक उभारला आहे. त्यावर दोन वाहनांची धडक झाल्याचे देखील दर्शविण्यात आले आहे. तसेच याच फलकावर सावधान... अपघाती वळणे... वाहन सावकाश चालवा, अशी स्पष्ट सुचना देण्यात आली आहे. मात्र, या फलकाकडे, या फलकावरील सुचनेकडे कायम दुर्लक्ष करण्यात येते. त्यामुळे अनेकदा या वळणावर गंभीर अपघात होतात. आज झालेल्या अपघाताच्या शेजारी काही वर्षापूर्वी झालेल्या अपघातग्रस्त इंडिका गाडीचा सांगाडा पडला आहे. 

गाडीतील पातेले, पळी, झाकणीचे गुढ
संतप्त ग्रामस्थांनी मोटार जाळली.  मात्र, तेथे सुस्थितीत पडलेले पातेले , गाडीमध्ये मागील बाजुस झाकणी व पळी पडली होती. याचे गुढ काय? या बाबात उलट सुलट चर्चा होती. याबाबत बांगर यांनी सांगितले की, यासंदर्भात पोलीस तपास करणार आहेत. तपासात या बाबी स्पष्ट होतील. 

Web Title: Two students were hit by a heavy car, and the angry mob wrecked the car

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Accidentअपघात