कोथरुडमधून दोघे संशयित ताब्यात; संशयास्पद कागदपत्रे आढळल्याने खळबळ
By विवेक भुसे | Published: July 18, 2023 11:18 PM2023-07-18T23:18:25+5:302023-07-18T23:20:30+5:30
कोथरुडमध्ये आलेल्या दोघा तरुणांना शहर पोलिस दलाने संशयावरुन मंगळवारी सायंकाळी ताब्यात घेतले.
लोकमत न्यूज नेटवर्क, पुणे : कोथरुडमध्ये आलेल्या दोघा तरुणांना शहर पोलिस दलाने संशयावरुन मंगळवारी सायंकाळी ताब्यात घेतले. त्यांच्याकडील लॅपटॉपमध्ये काही संशयास्पद कागदपत्रे आढळून आल्याने शहर पोलिस दलाची ही माहिती दहशतवाद विरोधी पथकाला कळविली आहे.
याबाबत वरिष्ठ पोलिस अधिकार्यांनी सांगितले की, कोथरुडमध्ये दोन परप्रांतीय तरुण संशयास्पदरित्या फिरत असल्याची माहिती मंगळवारी सायंकाळी ६ वाजता मिळाली होती. त्यावरुन २५ ते ३० वयोगटाच्या या दोन तरुणांना ताब्यात घेऊन चौकशी केली. तेव्हा त्यांच्याकडे जिवंत काडतुसे मिळाली. मात्र, पिस्तुल मिळाले नाही. त्यांच्याकडील लॅपटॉपची पाहणी केल्यावर त्यात काही संशयास्पद कागदपत्रे आढळून आली. हे तपासल्यानंतर त्यांचा कोणत्या दहशतवादी कृत्यामध्ये हात असू शकतो, हे लक्षात घेऊन ही माहिती दहशतवाद विरोधी पथकाला कळविण्यात आली आहे. एटीएस आणि पुणे पोलिस अधिक चौकशी करीत असल्याचे या वरिष्ठ पोलिस अधिकार्यांनी सांगितले.