भिगवणमध्ये रस्त्यात अडवून लूटमार करणाऱ्या दोन चोरट्यांना ठोकल्या बेड्या
By ऑनलाइन लोकमत | Published: July 13, 2021 11:18 AM2021-07-13T11:18:01+5:302021-07-13T11:18:11+5:30
स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलीस पथकाची कामगिरी, ५० हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त
लोणी काळभोर: भिगवणमध्ये रस्त्यात अडवून धमकी देत लूटमार करणाऱ्या दोघांना जेरबंद करण्यात स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलीस पथकाला यश आले आहे. त्यांच्याकडून ५० हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी नवनाथ बबन शिंदे ( वय ३०, रा.लोणी काळभोर) व लखन रमेश झेंडे ( वय २५, रा. दौंड) या दोघांना अटक करण्यात आली आहे.
स्थानिक गुन्हे विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवार सकाळी पुणे सोलापूर महामार्गावर भिगवण पोलीस ठाण्याचा हद्दीत अनराज महंमद अन्सारी हे बेकरी व्यावसायिक माल घेऊन चालले होते. भिगवण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आनंद हॉटेलजवळ आरोपींनी आपली दुचाकी त्यांच्या गाडीसमोर आडवी घातली. त्यांना शिवीगाळ आणि मारहाण करत 'तुझा मोबाईल व तुझ्याकडील पैसे दे नाही तर तुला सोडणार नाही' असे म्हणून अन्सारी यांचा मोबाईल घेऊन पळून गेले .
सदरच्या गुन्ह्यात कोणताही पुरावा नसताना फक्त गाडी आणि आरोपी यांच्या वर्णनावरून माहिती गोळा करण्यात आली. पोलिसांना गोपनीय खबऱ्यामार्फत लाल रंगाच्या दुचाकी वरून दोघे आरोपी थेऊर फाटा येथे एका हॉटेल जवळ थांबल्याचे कळाले. यावरून त्याठिकाणी जाऊन सदरील गाडी वापरत असलेल्या नवनाथ शिंदे व लखन झेंडे या दोघांना ताब्यात घेतले. चौकशी केल्यावर त्यांनी गुन्हा केल्याची कबुली दिली. त्यांच्याकडून मोबाईल आणि स्कुटी असा एकूण ५० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून या दोघांना मुद्देमालासह पुढील तपासासाठी भिगवण पोलिस ठाण्याच्या ताब्यात दिले आहेत.