दोन हजारात, आंतरराष्ट्रीय वाहन परवान्यांचे ऑनलाईन होणार नूतनीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2021 04:15 AM2021-08-27T04:15:19+5:302021-08-27T04:15:19+5:30
आंतरराष्ट्रीय लायसन्स काढण्यात वाढ : ‘आरटीओ’त जाण्याची नाही गरज लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : आंतरराष्ट्रीय वाहन परवान्याची मुदत संपल्यानंतर ...
आंतरराष्ट्रीय लायसन्स काढण्यात वाढ : ‘आरटीओ’त जाण्याची नाही गरज
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : आंतरराष्ट्रीय वाहन परवान्याची मुदत संपल्यानंतर आता पुन्हा प्रादेशिक परिवहन कार्यालयात (आरटीओ) उपस्थित राहून पुन्हा नवीन परवाना काढण्याची गरज नाही. आता ज्या देशांत वास्तव्य आहे तिथून देखील वाहन परवान्याचे ऑनलाईन नूतनीकरण करता येणार आहे. त्यासाठी त्यांना दोन हजार रुपये मोजावे लागणार आहेत. ‘वाहन’ या प्रणालीवर जाऊन अथवा संबंधित देशातील भारतीय दूतावासात जाऊन त्यांना ही प्रक्रिया पूर्ण करता येणार आहे.
२०१९ साली केंद्र सरकारने याला पहिल्यांदा मंजुरी दिली. तर २०२० साली राज्य सरकारने मंजूरी दिली. मात्र अजून अंमलबजावणीस सुरुवात झालेली नाही. लवकरच सुविधा उपलब्ध होईल. पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय वाहन परवाना काढणार असाल तर त्यासाठी एक हजार रुपये शुल्क आकारले जाते.
एप्रिल ते ऑगस्ट या पाच महिन्यांत जवळपास ३ हजार आंतरराष्ट्रीय वाहन परवाने पुणे आरटीओतून काढण्यात आले. गेल्या वर्षी २ हजार २२४ आंतरराष्ट्रीय वाहन परवाने पुणे आरटीओने दिले.
चौकट
कोण काढतो हा परवाना :
परदेशात शिक्षण घेणारे, नोकरी व व्यवसाय करणाऱ्यांना परदेशात वाहन चालविण्यासाठी आंतरराष्ट्रीय वाहन परवाना अनिवार्य आहे. त्यासाठी ते पुणे आरटीओ अथवा संबंधीत देशातील भारतीय दूतावास येथे वाहन परवान्यासाठी अर्ज करू शकतात.
चौकट
आंतरराष्ट्रीय वाहन परवान्याची आकडेवारी
१ एप्रिल २०१९ ते ३१ मार्च २०२० : १,५३८
१ एप्रिल २०२० ते ३१ मार्च २०२१ : २,२२४
१ एप्रिल २०२१ ते २५ ऑगस्ट २०२१ : ३,०००
चौकट
आंतरराष्ट्रीय परवान्यासाठीची कागदपत्रे
१. वाहन परवाना
२. व्हिसा
३. पासपोर्ट
४. पासपोर्ट आकाराचे चार फोटो
५. एमबीबीएस डॉक्टरांचे प्रमाणपत्र
६. एक हजार शुल्क - ऑनलाईन भरणा
७.. ऑनलाईन फॉर्म भरून त्याची प्रिंट आरटीओ कार्यालयात-दुतावासात देणे
चौकट
“भारत सरकारने आंतरराष्ट्रीय वाहन परवान्याचे नवे प्रारूप तयार केले आहे. त्यानुसार भारतीय दूतावासात गेल्यावर देखील वाहन परवाना मिळेल. मात्र याची अंमलबजावणी अजून सुरू झालेली नाही.”
-राजेंद्र पाटील, सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी, पुणे .