कोरेगाव भीमात दोन हजार पोलिसांचे संचलन
By ऑनलाइन लोकमत | Published: December 30, 2019 03:45 PM2019-12-30T15:45:11+5:302019-12-30T15:49:32+5:30
कोरेगाव भीमा परिसरात १ जानेवारी २०१८ ला झालेल्या दंगलीच्या पार्श्वभूमीवर मोठा फौजफाटा तैनात..
कोरेगाव भीमा : कोरेगाव भीमा परिसरात १ जानेवारी २०१८ ला झालेल्या दंगलीच्या पार्श्वभूमीवर पुणे ग्रामीण पोलिसांनी परिसरात मोठा फौजफाटा लावला असतानाच रविवारी पुणे-नगर महामार्गावरून दोन हजार पोलिसांनी संचलन करीत सुरक्षेचा आढावा घेतला. या वेळी कोरेगाव भीमा गावातूनही संचलन करण्यात आले. या वेळी अपर पोलीस अधीक्षक जयंत मीना यांनी पोलीस सर्व बाजूंनी सतर्क असून, गतवर्षीप्रमाणे या वर्षीही मानवंदना कार्यक्रम शांततेत साजरा होणार असल्याचे सांगितले.
कोरेगाव भीमा परिसरात १ व २ जानेवारी २०१८ रोजी झालेल्या दंगलीच्या पार्श्वभूमीवर या वर्षी प्रशासनाने कमालीची सतर्कता बाळगली आहे. कोरेगाव भीमामध्येच दोन हजारांपेक्षा जास्त पोलीस फौजफाटा, राज्य राखीव दलाच्या ८ तुकड्या तैनात आहेत. गावांमधून सामाजिक सलोखा जपण्यासाठी प्रत्येक चौकात, वस्तीवर एक अधिकारी, १० कर्मचारी तैनात असणार आहेत. गावातील प्रत्येक उपनगराला बॅरिकेडिंग करण्यात येणार असून, कोरेगाव भीमा, पेरणे व वढू बुद्रुक या ठिकाणी २९ डिसेंबरपासूनच ५ हजारांपेक्षा जास्त पोलीस बंदोबस्त दिला आहे.
या पोलिसांचे गावोगाव संचलन कालपासून सुरू करण्यात आले आहे. पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांच्या सूचनेप्रमाणे घेण्यात आलेल्या या संचलनामध्ये अतिरिक्त पोलीस अधीक्षक जयंत मीना, उपविभागीय पोलीस अधिकारी ऐश्वर्या शर्मा, आँचल दलाल, शिक्रापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सदाशिव शेलार यांच्यासह ५ पोलीस निरीक्षक, १० पोलीस उपनिरीक्षक, सहायक पोलीस उपनिरीक्षक अविनाश थोरात, ८०० जिल्हा पोलीस, ४०० होमगार्ड व राज्य राखीव पोलीस दलाच्या आठ तुकड्यांमधील जवान, तसेच कोरेगाव भीमाच्या सरपंच संगीता कांबळे, पोलीस पाटील मालन गव्हाणे पाटील आदी सहभागी झाले होते.
....
वाहतूककोंडी टाळण्यासाठी पर्यायी मार्ग
भीमाकाठावरील कोरेगाव भीमानजीक ऐतिहासिक विजयस्तंभास मानवंदना देण्यासाठी विविध पक्ष, संघटना व मान्यवरांसह महाराष्ट्रासह विविध राज्यांतून लाखो आंबेडकरी बांधवांची अलोट गर्दी होत असते. मात्र गतवर्षीच्या दंगलीच्या पार्श्वभूमीवर पुणे-नगर रस्त्यावर गर्दीमुळे चारही बाजूंनी येणारी वाहतूक ३१ डिसेंबर रात्री १२ ते १ जानेवारी रात्री १२ पर्यंत लोणी कंद व शिक्रापूर पोलिसांनी शिक्रापूर व खराडी बायपास येथून वळविण्यात आली आहे.
......
पुणे- नगर महामार्गावरील कोरेगाव भीमाजवळील पेरणे फाटा येथे विजयस्तंभास मानवंदना देण्यासाठी राज्यभरातून आलेल्या आंबेडकरी बांधवांच्या वाहनासह या मार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहनांमुळे मोठ्या प्रमाणावर वाहतूककोंडी होत असते.
ही वाहतूककोंडी टाळण्यासाठी मोटार वाहन कायदा १९८८ चे कलम ११५ व ११७ नुसार दि. १ रोजी रात्री १२ वाजल्यापासून रात्री १२ पर्यंत पुणे-नगर महामार्गावरील वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्याच्या सूचना पोलिसांना परिसरात सुरक्षेच्या कारणाास्तव कोरेगाव भीमा व पेरणे परिसरातील प्रत्येक भागाची नवी मुंबई बॉम्बशोधक पथकाकडून तपासणी केली जात असून दोन दिवस या पथकाकडून परिसराची तपासणी होणार आहे.
2- १ जानेवारी मानवंदनेसाठी येणाºया समाजबांधवांच्या व स्थानिक नागरिकांच्या सुरक्षेची मोठी जबाबदारी पोलीस प्रशासनावर असल्याने गेले दोन पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून कोरेगाव भीमा व पेरणे परिसराची बॉम्बशोधक पथकाच्या वतीने कसून तपासणी केली जात आहे.
3- प्रत्येक पथकात १ अधिकारी, ७ कर्मचारी व एका श्वानाच्या मदतीने तपासणी करीत आहेत. या पथकांमध्ये नवी मुंबई, पुणे ग्रामीण, पुणे शहर, रेल्वेसह सातारा, सांगली येथील बॉम्बशोधक पथकाने कोरेगाव भीमा, पेरणे, वढू बुद्रुकसह परिसरातील वाड्या-वस्त्या गावठाण यांसह शिक्रापूर व लोणी कंद पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वाहनतळांची तपासणी केली.