निवडणुकीसाठी दोन हजार मतदान केंद्रे

By admin | Published: January 11, 2017 03:15 AM2017-01-11T03:15:29+5:302017-01-11T03:15:29+5:30

पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक फेब्रुवारी २०१७ला होणार असून, मतदारयादी तयार करण्याचे काम ८० टक्के पूर्ण झाले आहे.

Two thousand polling stations for elections | निवडणुकीसाठी दोन हजार मतदान केंद्रे

निवडणुकीसाठी दोन हजार मतदान केंद्रे

Next

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक फेब्रुवारी २०१७ला होणार असून, मतदारयादी तयार करण्याचे काम ८० टक्के पूर्ण झाले आहे. शहरात निवडणुकीसाठी दोन हजार मतदान केंद्र असणार आहेत. महापालिका निवडणुकीसाठी पावणेअकरा लाख मतदार संख्या आणि नव मतदार असे साडेबारा लाख मतदार असणार आहेत.
नवीन मतदार नोंदणीनंतर सुमारे दहा टक्के भागयाद्यांची वाढ अपेक्षित धरली आहे. त्यामुळे सुमारे दोन हजार भागयाद्या असतील, असा अंदाज आहे.
निवडणुकीच्या कामाचे वाटप करण्याचे नियोजन सुरू झाले आहे. निवडणूक काळात वीस पथके असणार आहेत. त्यांत १० कर्मचाऱ्यांचा समावेश असणार आहे. तसेच निवडणूक विभागाच्या एका पथकाच्या माध्यमातून मतदान केंद्राची जागांची पाहणी केली जात आहे. मतदान केंद्राची जागा, खोल्या, इमारतींची पाहणी केली जात आहे. त्यात तळमजल्यावरील खोल्यांना प्राधान्य दिले जाणार आहे.
गूगल मॅपच्या माध्यमातून मतदान केंद्राची तपासणी केली जात आहे. याच तंत्रज्ञानानुसार भागयाद्या, मतदान केंद्रावरील पत्ता निश्चित केला जाणार आहे. तसेच मतदान केंद्रावरील विद्युत, स्थापत्यविषयक कामे कोणकोणती करावी लागणार आहेत, याचीही पाहणी केली जात आहे. एका भागयादीमध्ये सुमारे साडेसातशे ते साडेआठशे मतदार असणार आहेत. पहिल्या टप्प्यातील मतदारांनुसार १९५० याद्या अपेक्षित असून, नवमतदारांमुळे ही संख्या दोन हजार केंद्रावर जाणार आहे. त्यासाठी प्रत्येक केंद्रासाठी एक असा मतदान अधिकारी प्रमुख,एक, दोन आणि तीन वेगवेगळे सहायक, प्रत्येकी एक शिपाई असा सुमारे बारा हजार कर्मचारी आवश्यक असणार आहेत. प्रत्येक केंद्रासाठी एक पोलीस कर्मचारीही नियुक्त केला जाणार आहे.

कर्मचाऱ्यांची नियुक्ती
निवडणुकीसाठी मतदारयादीचे अद्ययावतीकरण, बूथ तयार करणे, जागांची पाहणी करणे, मतदान केंद्रांची निश्चिती करणे, मतदानासाठी कर्मचाऱ्यांची नियुक्ती करणे अशी कामे सुरू झाली असून, निवडणुकीसाठी सुमारे १५ हजार कर्मचारी नियुक्त केले जाणार आहेत. मतदारयादीचे काम अंतिम टप्प्यात असून, १९५० भाग याद्या असून, त्यांपैकी पावणेनऊशे भागयाद्यांचे अर्थात ऐंशी टक्के काम पूर्ण झाले आहे. १५ डिसेंबरला त्या निवडणूक आयोगाला सादर केल्या जाणार आहेत. त्यानंतर सूचना, हरकती आणि पुरवणी यादीसह संकेतस्थळावर यादी प्रकाशित केली जाणार आहे.

गावाकडून कार्यकर्ते रवाना
४पिंपरी : महापालिका निवडणुकीसाठी शहरी भागातील नेते ‘शहर चलो’ अभियान राबविताना दिसत आहेत. पुणे आणि इतर जिल्ह्यांमधील ग्रामीण भागांमधून आता कार्यकर्ते शहरात दाखल झाले आहेत. गावाकडून येण्यासाठी बस, अलिशान गाड्या व इतर वाहनांची सोय केली जात आहे. प्रभागरचना बदलल्याने या वेळी बहुतांश सर्वच प्रभागात चुरशीची लढाई सुरू झाली आहे. उमेदवारांनी प्रत्येक मतदारावर लक्ष केंद्रित केले आहे. मात्र या कामी लागणारे मनुष्यबळ कमी पडत असल्याने हे मनुष्यबळ गावाकडून मागवावे लागत आहे.

‘पेड मॅन पॉवर’ फॉर्म्युला
४काही उमेदवारांनी अशा कार्यकर्त्यांना आणण्याचा ताप आपल्याकडे नको, म्हणून प्रचार करणा-या संस्थांनाच हे काम सोपविले आहे. तसेच शहरात असे अनेक एजंट पाहायला मिळत आहेत, जे ‘पेड मॅन पॉवर’ पुरविण्याचेच काम करीत आहेत. गावाकडील अनेक नातेवाईकांना येथे हंगामी नोकरी असल्याचे सांगून बोलविले जात आहे. रोज खाऊन-पिऊन सातशे-ते हजार रुपये मिळत असल्याने ग्रामीण भागातील कार्यकर्तेही मोठ्या संख्येने दाखल होत आहेत. काही नगरसेवकांनी आपल्या गावकडील राजकीय मित्राला गळ घालून कार्यकर्त्यांची निर्यात करायला सांगितल्याचेही पाहायला मिळत आहे.
४गावाकडून येण्यासाठी संख्येप्रमाणे बस, टेंपो व इतर वाहने उपलब्ध करून दिली जात आहेत. वाहनांची बुकिंगही सुरू झाली आहे. कार्यकर्त्याला येण्या-जाण्याचा खर्च व जेवणाची सोयही केली जाणार आहे. या वेळी कार्यकर्त्यांना विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. जास्तीत जास्त कार्यकर्ते आपल्या प्रचारात कसे उतरवता येतील यासाठी नेत्यांनी प्रयत्न सुरू केले आहेत. यासाठीच गावाकडील मनुष्यबळ वापराचा फंडा जोर धरत आहे.

गूगल मॅपच्या माध्यमातून मतदान केंद्राची तपासणी
15000 हजार कर्मचारी नियुक्त
1950 भागयाद्या, एका यादीत 700 ते 800 मतदार
20 पथके निवडणूक काळात कार्यरत

Web Title: Two thousand polling stations for elections

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.