पुणेकरांना ‘कन्नड’ ची गोडी; दोन हजारांपेक्षा अधिक पुणेकरांनी गिरवले धडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2018 05:00 PM2018-07-21T17:00:37+5:302018-07-21T17:15:30+5:30

महाराष्ट्र-कर्नाटक मधून विस्तवही जात नसल्याची एकीकडे स्थिती असताना दुसरीकडे मराठी-कन्नड भाषांचा अणुबंध पुणेकरांकडून विणला जात आहे.

two thousand punekar learning kannad language | पुणेकरांना ‘कन्नड’ ची गोडी; दोन हजारांपेक्षा अधिक पुणेकरांनी गिरवले धडे

पुणेकरांना ‘कन्नड’ ची गोडी; दोन हजारांपेक्षा अधिक पुणेकरांनी गिरवले धडे

Next
ठळक मुद्देमराठी आणि कन्नड भाषेचा जवळपास ८०० वर्षांपासूनचा अनुबंध केंद्राकडून कन्नड भाषेची दरवर्षी लेखी आणि तोंडी अशी दोनशे मार्कांची परीक्षा अमराठी भाषिकांचा ‘मराठी’ वर्गाला प्रतिसाद नाही 

पुणे : कर्नाटक सीमा प्रश्नाचं घोंगडे शासनदरबारी अनेक वर्षांपासून भिजत पडले आहे. मात्र, या राजकीय वादात न पडता मराठी आणि कन्नड भाषिकांकडून भाषेच्या संवादाचा धागा विणला जात आहे. कन्नड भाषेबाबत मराठी भाषिकांमध्ये ’गोडी’ वाढत असून, मराठी-कन्नड स्नेहवर्धन केंद्राच्या माध्यमातून दोन हजारांपेक्षा अधिक पुणेकरांनी कन्नडचे धडे गिरविले आहेत. 
प्रत्येक व्यक्तीला आपल्या भाषेविषयी प्रेम आणि अभिमान असतो. आपल्या मूळ गावापासून दूर गेलो तरी भाषेवरचे प्रेम कधीच कमी होत नाही. आज कर्नाटक राज्यातील कितीतरी कुटुंब महाराष्ट्रात स्थायिक झाली आहेत. महाराष्ट्रातही अनेक कन्नड शाळा आहेत. जुन्या व्यक्तींचा आपल्या गावाशी संपर्क कायम असला, त्यांना मातृभाषा बोलता येत असली तरीही कुटुंबांतील पुढच्या पिढ्यांची आपल्या भाषेविषयीची नाळ जवळपास तुटली आहे. त्यामुळे आपल्याच कन्नड भाषिकांशी संवादाची दालनं बंद झाल्याची नव्या पिढीची अवस्था आहे. यातच इंग्रजी ही व्यावहारिक भाषा बनल्याने प्रादेशिक भाषांसमोर अस्तित्व टिकविण्याचे खूप मोठे आव्हान आहे. कित्येक वर्षांपासून राजकीय पटलावर कर्नाटक सीमा प्रश्न प्रलंबित आहे. महाराष्ट्र-कर्नाटक मधून विस्तवही जात नसल्याची एकीकडे स्थिती असताना दुसरीकडे मराठी-कन्नड भाषांचा अणुबंध विणला जाणे, ही जमेची बाजू आहे. कृष्णा हेगडे हे स्नेहवर्धन केंद्राच्या माध्यमातून दोन भाषांमध्ये  सेतू निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहेत. याविषयी ‘लोकमत’शी बोलताना ते म्हणाले, मराठी आणि कन्नड भाषेचा अनुबंध जवळपास ८०० वर्षांपासूनचा आहे. मराठीमधील काही शब्दांची व्युत्पत्ती कन्नड भाषेमधून झाली आहे. उदा: मराठीमध्ये  ‘हुडकणे’ असे म्हणतात. मूळ क्रियापद  ‘हुडकू’ आहे जे कन्नडमधून आले आहे. तसेच ‘पाणी तुंबले’ हा मराठी शब्द. मूळ  ‘तुंबू’ हा कन्नड शब्द आहे. पंढरपूरचा पांडुरंग हा मूळ कर्नाटकचा आहे जो इथे येऊन स्थायिक झाला आहे. कर्नाटकामधील अनेक कुटुंब देखील महाराष्ट्रात स्थायिक झाली आहेत. इथे येऊन ते मराठी शिकले, मात्र, त्यांच्या पिढ्यांचा कन्नड भाषेशी गंधच राहिलेला नाही. ते कन्नड शिकू शकले नाहीत. त्यामुळे पुणेकर झालेल्या मराठी भाषिकांचा कन्नड शिकण्याकडे ओढा वाढत आहे. यातच ब-याचशा आयटी कंपनी बेंगळूरमध्ये आहेत. स्थानिक भाषेतील लोकांशी संवाद साधण्यासाठी कन्नड भाषेचा आधार घेतला जात आहे. केंद्राकडून दरवर्षी लेखी आणि तोंडी अशी दोनशे मार्कांची परीक्षा घेतली जाते. आजपर्यंत दोन हजारांहून अधिक तरूण आणि ज्येष्ठ नागरिकांनी ही परीक्षा दिली असल्याचे त्यांनी सांगितले.
----------------------------------------------------------
अमराठी भाषिकांचा ‘मराठी’ वर्गाला प्रतिसाद नाही 
अमराठी भाषिकांसाठी स्नेहवर्धन केंद्राकडून मराठी भाषेचा वर्गही घेतला जातो. मात्र अमराठींकडून ‘मराठी’ वर्गाला फारसा प्रतिसाद मिळत नसल्याची खंत कृष्णा हेगडे यांनी व्यक्त केली. 
-------------------------------------------------------------

Web Title: two thousand punekar learning kannad language

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.