दोन ट्रक वाळूसह ३० लाखांचे सहित्य जप्त
By admin | Published: July 8, 2016 03:52 AM2016-07-08T03:52:47+5:302016-07-08T03:52:47+5:30
पुणे-सोलापूर महामार्गावर रात्रगस्तीच्या पथकातील हवालदार व त्याच्या सहकाऱ्याने चोरून चालवलेल्या साडेचार ब्रास वाळूसह दोन ट्रक असे ३० लाख ४५ हजारांचे साहित्य जप्त केले.
इंदापूर : पुणे-सोलापूर महामार्गावर रात्रगस्तीच्या पथकातील हवालदार व त्याच्या सहकाऱ्याने चोरून चालवलेल्या साडेचार ब्रास वाळूसह दोन ट्रक असे ३० लाख ४५ हजारांचे साहित्य जप्त केले. तिघाजणांविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली. त्यांना न्यायालयीन कोठडी मिळाली आहे.
जितेश नामदेव भवाळे (वय २८, रा. भाबुरा, ता. कर्जत, जि. अहमदनगर), बाळू भगवान सायकर (वय ३५, रा. राशीन, ता. कर्जत, जि. अहमदनगर), सचिन सुभाष गावडे (वय २२, मूळ रा. चिंचोली रमजान, ता. कर्जत, जि. अहमदनगर) अशी आरोपींची नावे आहेत.
हवालदार शंकर वाघमारे, पोलीस कर्मचारी विनोद पवार यांनी ही कामगिरी केली. वाघमारे यांनी फिर्याद दिली आहे. त्यांनी सांगितले की, मंगळवारी (दि. ५) हे दोघे रात्रगस्तीच्या पथकात होते. रात्री अडीच वाजण्याच्या सुमारास कालठण नं. २ गावच्या हद्दीत, इंदापूरकडे जाणाऱ्या रस्त्याने दोन ट्रक (एमएच १२ एमव्ही ३६११), (एमएच १२/ केपी ३६११) येताना त्यांनी पाहिले.दोन्ही वाहनांचे क्रमांक एकसारखे असल्याने संशय बळावला. पाहणी केल्यानंतर त्यामध्ये वाळू असल्याचे दिसले. ट्रकच्या मालकांसंदर्भात व वाळूची रॉयल्टी याबाबत उडवाउडवीची उत्तरे मिळाल्याने भवाळे व सायकर या दोन्ही वाहनचालकांना व बोटीचा व्यवस्थापक असणाऱ्या गावडे या तिघांना त्यांनी ताब्यात घेतले. वाळूसह ट्रक जप्त केले. (वार्ताहर)