तीर्थक्षेत्र आळंदीत प्रशासनाचा आदेश झुगारून हद्दीबाहेरील दोन विवाह सोहळे ; दोन कार्यालय चालकांवर गुन्हे
By ऑनलाइन लोकमत | Published: May 26, 2020 12:29 PM2020-05-26T12:29:20+5:302020-05-26T12:29:31+5:30
आळंदी बाहेरील हजारो वऱ्हाडी मंडळी शहरात येऊ लागल्याने कोरोना संसर्ग होण्याची शक्यता निर्माण
आळंदी (शेलपिंपळगाव) : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तीर्थक्षेत्र आळंदीत फक्त स्थानिकांनाच लग्न सोहळा आयोजित करण्याची परवानगी देण्यात आली आहे. स्थानिक नगरपालिकेचे मुख्याधिकारी व पोलीस प्रशासनाने यापूर्वी तशा सूचनाही दिल्या आहेत. मात्र शहरात रविवारी (दि.२४) दोन वेगवेगळ्या विवाह कार्यालयात प्रशासनाच्या आदेशाचे उल्लंघन करत हद्दीबाहेरील लग्न सोहळे पार पडले. याप्रकरणी दोन विवाह मंगल कार्यालय चालकांवर कलम १८८ प्रमाणे गुन्हे दाखल करण्यात आल्याची माहिती मुख्याधिकारी समीर भूमकर यांनी दिली.
मागील दोन महिन्यांपासून राज्यात लॉकडाऊन सुरू असून संचारबंदी करण्यात आली आहे. सद्यस्थितीत लॉकडाऊनचा चौथा टप्पा सुरू असून सामाजिक, धार्मिक, सांस्कृतिक, क्रीडा आदी कार्यक्रम आयोजित करण्यावर मज्जाव घालण्यात आला आहे. दरम्यान लग्न समारंभास काही अटींच्या शर्तीवर ५० व्यक्तींची परवानगी देऊन लग्न करण्यास मुभा देण्यात आलेली आहे. यापार्श्वभूमीवर आळंदीतील मंगल कार्यालये, धर्मशाळा व हॉलमध्ये मोठ्या प्रमाणात विवाह आयोजित केले जाऊ लागले. परिणामी आळंदी बाहेरील हजारो वऱ्हाडी मंडळी शहरात येऊ लागल्याने कोरोना संसर्ग होण्याची शक्यता निर्माण झाली.
यापार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून थेट प्रांताधिकारी संजय तेली यांनी शहराबाहेरील नागरिकांना शहरात विवाह सोहळा आयोजित करण्यास परवानगी देण्यात येणार नसल्याचा आदेश जारी केला. स्थानिक नगरपालिका आणि पोलीस प्रशासनाने शहरातील मंगल कार्यालये व धर्मशाळा व्यवस्थापकांना लेखी सूचना दिल्या. परंतु कार्यालय चालकांना सूचना देऊनही नियमांचे उल्लंघन करत असल्याचे आढळून येत आहे.
................
आळंदी शहरालगत असलेल्या मोशी, चऱ्होली दिघी आदी भागात कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत. तरीसुद्धा आळंदीत कोरोनाची धास्ती न घेता अनेकजण पैसे कमविण्यासाठी लग्नाच्या ऑर्डर घेत आहेत. शहरातील विविध मंगल कार्यालये, धर्मशाळा आणि घरातही लग्न कार्ये आयोजित करून पार पाडली जात आहेत. मात्र यांमुळे शहरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.