गांजा तस्करी करणा-या महिलेसह दोघे गजाआड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2021 04:09 AM2021-07-18T04:09:31+5:302021-07-18T04:09:31+5:30
पुणे : पुणे-सासवड रोडवर गांजा विक्रीसाठी मोटारीतून आलेल्या तस्कराला गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने पकडून त्यांच्याकडून ४० किलो ...
पुणे : पुणे-सासवड रोडवर गांजा विक्रीसाठी मोटारीतून आलेल्या तस्कराला गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने पकडून त्यांच्याकडून ४० किलो गांजा जप्त केला आहे. त्याचबरोबर त्याला विक्रीसाठी हा गांजा देणारी मुख्य सूत्रधार महिलेला अटक केली आहे.
सचिन नरसिंग शिंदे (वय ३३, रा. रामलिंग रोड, ता. शिरूर) आणि भाग्यश्री बाबूराव घुगे (वय ४०, रा. शिरूर) अशी दोघांची नावे आहेत. त्यांच्याकडून ८ लाख १० हजारांचा गांजा, मोटार व मोबाईल असा १३ लाख २९ हजार रुपयांचा माल जप्त केला आहे.
अमली पदार्थविरोधी पथकाचे एक पथक गस्तीवर असताना सातववाडी हडपसर बसथांब्यासमोरील सार्वजनिक रोडवर एक व्यक्ती गांजाविक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती हवालदार मनोज साळुंके यांना माहिती मिळाली होती त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड, पोलीस अंमलदार प्रवीण शिर्के, राहुल जोशी, विशाल शिंदे, विशाल दळवी यांच्या पथकाने सापळा रचून शिंदे याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे चौकशी करून गाडीची झडती घेतली असता ४० किलो गांजा मिळाला. त्याने तो गांजा त्याची शिरूर येथील मालकीण भाग्यश्री घुगे हिच्याकडून आणल्याचे पोलिसांना सांगितले. त्यानंतर पोलिसांनी एक पथक घुगे हिच्या घराकडे रवाना करून तिला ताब्यात घेतले. याप्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली आहे.
भाग्यश्री हिचा पतीदेखील गांजाची तस्करी करीत असून, तो सध्या हैदराबाद येथील गुन्ह्यात कारागृहात असल्याचे पोलिसांनी सांगितले. गाजांची तस्करी करतानाच तेथील स्थानिक पोलिसांनी त्याच्यावर ८ महिन्यांपूर्वी कारवाई केली आहे. तर सचिन शिंदे याच्यावर देखील जेजुरी पोलीस ठाण्यात एक गुन्हा दाखल आहे.