जागेच्या वादातून दोघांवर कोयत्याने हल्ला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2021 04:10 AM2021-07-26T04:10:56+5:302021-07-26T04:10:56+5:30
बाभुळगाव : सरडेवाडी (ता. इंदापूर) येथील एक गुंठा जागेच्या वादातून इंदापुरातील दोघांवर तलवार, लोखंडी कोयता, लोखंडी वाकडा ...
बाभुळगाव : सरडेवाडी (ता. इंदापूर) येथील एक गुंठा जागेच्या वादातून इंदापुरातील दोघांवर तलवार, लोखंडी कोयता, लोखंडी वाकडा कोयता, लोखंडी गज व दगडाने हल्ला करून गंभीर जखमी केले. ही घटना शनिवारी (दि. २४) दुपारी २ च्या सुमारास सरडेवाडी येथे घडली. या प्रकरणी शिवाजी किसन एकाड (वय ३७, रा. इंदापूर, बाब्रसमळा,ता. इंदापूर) यांनी फिर्याद दिली.
संतोष बबन जाधव, लता बबन जाधव, जागामालक शंभो गिरी याचे वडील व आईसह चौघे (रा. अकलूज, ता. माळशिरस, जि. सोलापूर), रवी बबन जाधव, मोना रवी जाधव दोघे (रा. सरडेवाडी, ता. इंदापूर) अशी आरोपींची नावे आहेत. या घटनेत शिवाजी किसन एकाड (रा. इंदापूर, बाब्रसमळा), नामदेव ऊर्फ भय्या बाळू झेंडे (रा. चाळीस फुटी रोड, इंदापूर) हे दोघे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर अकलूज येथील खासगी दवाखान्यात उपचार सुरू आहेत.
शिवाजी एकाड यांनी अकलूज येथील शंभो गिरी यांच्या मालकीची सरडेवाडी (ता. इंदापूर) गावात एक गुंठा जागा १ लाख ६० हजार रूपयांना विकत घेतली होती. त्यापैकी १ लाख रूपये रक्कम शंभो गिरी यांना देऊन उरलेली रक्कम जागा खरेदी झाल्यानंतर द्यायचे ठरले होते. यानंतर शनिवारी (दि. २४) सकाळी १० वाजता शिवाजी एकाड यांना संतोष बबन जाधव याचा फोन आला व तो यांना फोन केला. शंभो गिरी गरीब माणूस आहे. गरिबाची जागा तू कशाला लुटतोय? त्याला अजून पैसे वाढवून दे नाहीतर माझी जागा घे. त्या वेळी फिर्यादींनी फोन कट केला.
त्यानंतर फिर्यादी व त्यांचा मित्र नवनाथ हे दोघे मिळून सरडेवाडीत व्यवहार झालेल्या जागेच्या ठिकाणी कंपाउंड काम चालू असल्याने तेथे गेले. दुपारी २ च्या सुमारास वरील सर्व आरोपींनी संगनमत करून शिव्याला जिवंत सोडायचे नाही म्हणत तलवार कोयत्याने हल्ला केला. एकाडे यांचा मित्र भांडण सोडविण्यासाठी मध्ये गेला असता त्याच्यावरही कोयत्याने वार केले. तसेच एकाडे यांच्या गळ्यातील ५ तोळे वजनाची सोन्याची चेन हिसकावून घेतली.