उद्योगनगरीत दुचाकी सुसाट; दिवसाला सरासरी १९७ दुचाकींची विक्री
By ऑनलाइन लोकमत | Published: August 10, 2022 10:54 AM2022-08-10T10:54:55+5:302022-08-10T10:56:14+5:30
ग्राहकांची इलेक्ट्रीक वाहनांना पसंती वाढली...
पिंपरी : सार्वजनिक वाहतूक व्यवस्था चांगली असावी म्हणून पिंपरी-चिंचवड शहरात मेट्रोसेवा सुरू करण्यात आली. पीएमपीच्या बस देखील मोठ्या प्रमाणात शहरात धावत आहेत. मात्र, सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेपेक्षा पिंपरी-चिंचवडकरांचा दुचाकीने प्रवास करण्यावरच जास्त भर असल्याचे दिसून येते आहे.
पिंपरी-चिंचवड उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाकडे १ एप्रिल ते ३१ जुलै या चार महिन्यांच्या कालावधीत तब्बल २३,६८८ दुचाकींची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या हद्दीत दिवसाला सरासरी १९७ दुचाकींची विक्री होत असल्याचे स्पष्ट होते आहे.
पुणे शहरात सर्वाधिक दुचाकी धावत असल्याने पुणे हे दुचाकीचे शहर म्हणून ओळखले जाऊ लागले आहे. मात्र, दुचाकी वाहन खरेदीच्या स्पर्धेत पिंपरी-चिंचवडकर देखील मागे नसल्याचे दिसून येते आहे. कारण अवघ्या चार महिन्यांच्या कालावधीत पिंपरी-चिंचवड उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाकडे २३ हजार ६८८ दुचाकींची विक्री झाली आहे.
इलेक्ट्रीक वाहनांना पसंती
दुचाकी विक्री करणाऱ्या शोरूम चालकाने सांगितले की, पूर्वी गाडी खरेदी करताना ग्राहक गाडी किती अव्हरेज देते, याची विचारणा करत होते. मात्र, आता ग्राहक अव्हरेज पेक्षाही इलेक्ट्रीक गाडीच हवी म्हणून आग्रही असतात. अगदी दोन ते तीन महिने वेटींग असून सुद्धा त्यांची थांबायची तयारी असते.
१७ कोटी ६७ लाखांची कमाई
दुचाकी वाहनातून मिळणारा महसूल दरवर्षी वाढतो आहे. एप्रिलपासून ते जुलै महिन्याच्या अखेरपर्यंत झालेल्या दुचाकी वाहन नोंदणीतून आरटीओ कार्यालयाला तब्बल १७ कोटी ६७ लाख ५२ हजार ६६० रुपयांचा महसूल मिळाला.
वाहन विक्रेते सावरले
मागील दोन वर्षांपूर्वी कोरोना संकटामुळे सर्वच व्यवसाय ठप्प झाले होते. हळूहळू सर्व व्यवसाय पूर्वपदावर आले होते. मात्र, वाहन खरेदीला अपेक्षित प्रतिसाद मिळत नव्हता. त्यामुळे वाहन विक्री करणाऱ्या कंपन्या चिंतेत होत्या. मात्र आता पूर्ण चित्र बदलले असून वाहन विक्रीला नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळतो आहे. इलेक्ट्रीक वाहनांसाठी तब्बल दोन महिन्यांचे वेटींग आहे.