परिंचे जवळ दुचाकींचा भीषण अपघात; दोन ठार, तर तीन जण जखमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 4, 2023 21:12 IST2023-11-04T21:11:47+5:302023-11-04T21:12:09+5:30
पुरंदर तालुक्यातील परिंचे ते सासवड रस्त्यावर दोन दुचाकींची समोरासमोर जोरदार धडक झाली.

परिंचे जवळ दुचाकींचा भीषण अपघात; दोन ठार, तर तीन जण जखमी
पुरंदर तालुक्यातील परिंचे ते सासवड रस्त्यावर दोन दुचाकींची समोरासमोर जोरदार धडक झाली. हा अपघात एवढा भीषण होता कि, यामध्ये दोघांचा जागीच मृत्यू झाला असून इतर तिघे जखमी आहेत. संजय जयसिंग नानगुडे, वय २६, रा. परिंचे आणि चंद्रकांत संपत दानवले, वय ५०. रा. सटलवाडी दोघे ता. पुरंदर अशी मृत्यू पावलेल्या व्यक्तींची नावे आहेत. तर शेखर दशरथ घोडके, वय २५, प्रतिक अनिल खोमणे, वय २५, दोघेही रा. परिंचे. आणि आकाश रोहिदास समगीर, वाय २४. रा. वीर, सर्वजण ता. पुरंदर हे जखमी असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत.
याबाबत सासवड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सविस्तर वृत्त असे कि, यातील मयत चंद्रकांत संपत दानवले हे शुक्रवार दि. ३ रोजी सायंकाळी त्यांच्या ताब्यातील स्प्लेंडर मोटार सायकल क्रमांक एमएच १२ जेपी ९४८९ वरून परिंचे कडून सटलवाडी येथे निघाले होते. तर संजय जयसिंग नानगुडे हे त्यांच्याकडील अक्टीव्हा गाडी क्रमांक एम एच १२ इएक्स ०५३२ वरून सटलवाडी कडून येत असताना शिवतारेवस्ती ते पोलदरा च्या दरम्यान दोन्ही दुचाकींची समोरासमोर जोरदार धडक झाली. हा अपघात एवढा भीषण होता कि, अपघात झाल्यावर दोन्ही दुचाकी उडून दूरवर फेकल्या गेल्या. तसेच यातील चंद्रकांत दानवले आणि संजय नानगुडे यांना गंभीर दुखापत झाल्याने मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव होवून जागीच मृत्यू झाला. तसेच एका दुचाकीवरील इतर तिघेही गंभीर जखमी झाले. याबाबत सासवडचे पोलीस निरीक्षक संतोष जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार अनिल खोमणे पुढील तपास करीत आहेत.