पुणे- सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर समोरासमोर धडक झाल्याने दुचाकींचा अपघात, दोघांचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: April 9, 2019 07:45 PM2019-04-09T19:45:14+5:302019-04-09T19:45:54+5:30
पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर दोन दुचाकीस्वारांची समोरासमोर धडक होवून अपघाताची घटना घडली.
कळस :पळसदेव (ता. इंदापूर) गावच्या हद्दीत पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर दोन दुचाकीस्वारांची समोरासमोर धडक होवून झालेल्या अपघातात दोन तरुण मृत्युमुखी पडल्याची घटना सोमवारी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास घडली. निखील भारत लावंड (वय १७) व साहिल अनिल भोसले (वय १८, दोघे रा. रुई, ता. इंदापूर) या तरुणांना अपघातात आपला प्राण गमवावा लागला. पळसदेव येथून संगणक प्रशिक्षणाचा तास संपल्यानंतर हे दुचाकीवरून आपल्या घरी परतत होते. या दुर्घटनेमुळे रुई गावावर शोककळा पसरली.
इंदापूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रुई येथील निखील भारत लावंड, साहिल अनिल भोसले, जयदीप संदिपान लावंड (वय १७) हे पळसदेव येथून संगणक प्रशिक्षणाचा क्लास संपल्यानंतर मोटारसायकलवरून (क्रमांक एमएच ४२/एल ४०८५) घराकडे परतत होते. सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास भगवान महादेव काळे (वय - ४०, रा. काळेवाडी) हे मोटारसायकलवरून (क्र. एमएच १२/६११५) हे पळसदेव गावच्या दिशेने जात होते. दरम्यान या दोन्ही मोटारसायकलस्वारांची समोरासमोर धडक होवून झालेल्या अपघातात भगवान काळे यांच्यासह निखील लावंड व साहिल भोसले हे गंभीर जखमी झाले. तर जयदीप लावंड हा किरकोळ जखमी झाला. अपघातग्रस्तांना ग्रामस्थांनी तातडीने रुग्णवाहिकेतून अकलूज येथील खासगी दवाखान्यात दाखल केले. दरम्यान इंदापूर येथील बायपास रस्त्याजवळ निखीलची प्राणज्योत मालवली. यानंतर त्याला इंदापूरच्या ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले. सकाळी त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. तर अकलूज येथे उपचार सुरू असताना दुपारी साहील भोसले याची प्राणज्योत मालवली. साहिलवर आज पाच वाजण्याच्या सुमारास अंत्यसंस्कार करण्यात आले. पुढील तपास इंदापूर पोलिस करत आहेत.
या दोघांनीही दहावीची परिक्षा दिली आहे.उन्हाळ्याच्या सुट्टीतील वेळ संगणक प्रशिक्षण घेण्यासाठी खर्च करण्याचे त्यांचे नियोजन होते. परंतू काळाने तत्पुर्वी त्यांच्यावर झडप घातली.दुर्घटनेने त्यांच्या कुटुंबियांवर दु:खचा डोंगर कोसळला. गावातील बाजारपेठ, दुकाने बंद ठेवून ग्रामस्थ या दु:खात सहभागी झाले होते.