Video: मद्यधुंद चालकाला रोखण्यासाठी दुचाकींचा पाठलाग; चाकण शिक्रापूर रोडवर अर्धा तास कंटेनरचा थरार
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2025 20:13 IST2025-01-16T20:12:11+5:302025-01-16T20:13:02+5:30
कंटेनर चालकाला रोखण्यासाठी दुचाकीवरून अनेक नागरिकांनी पाठलाग केला, त्याला रोखण्यात यश आल्यानंतर संतप्त जमावाने चालकाला बेदम चोप दिला

Video: मद्यधुंद चालकाला रोखण्यासाठी दुचाकींचा पाठलाग; चाकण शिक्रापूर रोडवर अर्धा तास कंटेनरचा थरार
शिक्रापूर :चाकणशिक्रापूर रस्त्यावर चाकणच्या पुढे शिक्रापूर दिशेने गुरुवारी दुपारी कंटेनर चालकाचा थरार पाहण्यास मिळाला. त्याला जातेगाव खुर्द येथील पंजाबी ढाब्याजवळ या कंटेनरच्या चालकाला रोखण्यात शिक्रापूर पोलीस व नागरिकाना यश आले. कंटेनर चालक चाकण येथून बेधुंदपणे वाहन ठोकरत शिक्रापूरच्या दिशेने निघाला होता.
हरियाणाचा कंटेनर चालक (अकिबखान वय २५वर्ष) याचा खेड व शिरूर तालुक्यातील चाकण शिक्रापूर रस्त्यावरील गावातील नागरिकांनी दुचाकी व चारचाकी वाहनाने पाठलाग करत त्याला रोखण्यासाठी प्रयत्न केला. चाकण येथील घटना घडल्यानंतर तेथील पोलिसांनी शिक्रापूर पोलिसांना या अगोदरच अलर्ट केले असल्याने या कंटेनर चालकाला रोखण्यासाठी शिक्रापूर पोलिसांनी खबरदारी घेतली होती. पोलिसांच्या या खबरदारीमुळे वाहन चालकांना याबाबत माहिती दिल्याने येथे मोठी हानी टळली. दरम्यान शिक्रापूर हद्दीत चौफुला येथे एक छोटा हत्ती व एक मारुती कारचे अपघातात नुकसान झाले. तर एक मुलगी जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे.
मद्यधुंद चालकाला रोखण्यासाठी दुचाकी व चारचाकींचा पाठलाग; चाकण शिक्रापूर रोडवर अर्धा तास कंटेनरचा थरार#Pune#chakan#shikrapur#Accidentpic.twitter.com/MSqrrd6jyR
— Lokmat (@lokmat) January 16, 2025
शिक्रापूर पोलीस हद्दीत पिंपळे जगताप पासून जातेगाव खुर्द अशा सुमारे पाच ते सहा किलोमीटर अंतरामध्ये या कंटेनर चालकाचा थरार पाहण्यास मिळाला. दुचाकी व चारचाकी वाहनाने नागरिकांनी या कंटेनरचा पाठलाग केला. अखेर कंटेनर जातेगाव खुर्द येथील पंजाबी ढाब्याजवळ या कंटेनरच्या चालकाला रोखण्यात यश आले. यावेळी संतप्त झालेल्या जमावाने या कंटेनर चालकाला बेदम चोप दिला. यामध्ये कंटेनर चालक गंभीर जखमी झाला असून त्याला पुढील उपचारासाठी पुणे येथे ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले. या घटनेनंतर चाकण शिक्रापूर रस्त्यावर मोठी वाहतूक कोंडी झाली होती. या कंटेनर बाबत शिक्रापूर पोलिसांना अगोदरच माहिती मिळाल्याने व दक्षता घेतल्याने कुठल्याही प्रकारची मोठी हानी झाली नसल्याची माहिती पोलीस निरीक्षक दिपरतन गायकवाड यांनी दिली.