दुचाकी चोरणारी टोळी जेरबंद; इंदापूर पोलिसांची कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 3, 2017 01:07 PM2017-10-03T13:07:21+5:302017-10-03T13:56:48+5:30
दुचाकीची चोरी करणार्या चौघाजणांच्या टोळीला इंदापूर पोलिसांनी जेरबंद करून त्यांच्याकडून ६ लाख ५ हजार रुपये किमतीच्या वेगवेगळ्या कंपनीच्या १७ दुचाकी हस्तगत केल्या आहेत.
इंदापूर : इंदापूर पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने दुचाकीची चोरी करणार्या चौघाजणांच्या टोळीला जेरबंद करून त्यांच्याकडून ६ लाख ५ हजार रुपये किमतीच्या वेगवेगळ्या कंपनीच्या १७ दुचाकी हस्तगत केल्या आहेत.
अभिजीत उर्फ सोन्या महादेव खबाले (रा. भाटनिमगाव, इंदापूर), अविनाश रवींद्र फलफले (गलांडवाडी नं. १, इंदापूर), रामेश्वर उर्फ भैया बाबुराव धनवडे (कदमवस्ती, इंदापूर), उस्मान शहानूर शेख (कळाशी, इंदापूर) अशी या टोळीतील सदस्यांची नावे आहेत. पोलिसांनी केलेल्या प्राथमिक चौकशीत या टोळीने इंदापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत दोन, बारामती तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत तीन, बारामती पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक, टेंभुर्णी (जि. सोलापूर) पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक असे पाच दुचाकी चोरीचे गुन्हे केल्याचे निष्पन्न झाले आहे. दौंड, माळशिरस येथे ही त्यांनी गुन्हे केल्याचे आढळून येत आहे.
इंदापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सजन हंकारे यांच्या मार्गदर्शनाखालील हवालदार शंकरराव वाघमारे, पोलीस शिपाई बापू मोहिते, अमित चव्हाण, जगदीश चौधर, गणेश पवार यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.