दुचाकी चोरणाऱ्या सराईत वाहनचोरास अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2021 04:12 AM2021-01-25T04:12:39+5:302021-01-25T04:12:39+5:30
धायरी : दुचाकी चोरणाऱ्या तरुणास सिंहगड रस्ता पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून १ लाख ५० हजार रुपये किमतीच्या पाच ...
धायरी : दुचाकी चोरणाऱ्या तरुणास सिंहगड रस्ता पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून १ लाख ५० हजार रुपये किमतीच्या पाच दुचाकी हस्तगत केल्या आहेत. साबीर इस्लामउद्दील अलम (वय १९, रा. चव्हाण आळी, नऱ्हे) असे अटक केलेल्या वाहनचोराचे नाव आहे.
सिंहगड रस्ता पोलीस ठाण्याच्या हद्दीत वाहनचोरीस प्रतिबंधात्मक उपयायोजना करण्यासाठी तपास पथकातील अधिकारी व कर्मचारी हे पेट्रोलिंग करून संशयित वाहनांची तपासणी करीत होते. दरम्यान, एक सराईत वाहनचोर सिंहगड रस्त्यावरील हॉटेल ब्रह्माजवळ चोरलेली दुचाकी घेऊन येणार असल्याचे तपास पथकातील पोलीस हवालदार आबा उत्तेकर यांना गुप्त बातमीदारांकडून समजले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक देविदास घेवारे यांच्या मार्गदर्शनाखाली सिंहगड रस्ता पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी यांनी हॉटेल ब्रह्मा चौकामध्ये सापळा रचून ताब्यात घेतले असता त्याने याधीही पाच दुचाकी वाहने चोरल्याची कबुली दिली.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक देवीदास घेवारे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) प्रमोद वाघमारे, सहायक पोलीस निरीक्षक चेतन थोरबोले, पोलीस उपनिरीक्षक कुलदीप संकपाळ, पोलीस कर्मचारी मोहन भुरुक, आबा उत्तेकर, राजेश गोसावी, शंकर कुंभार, उज्ज्वल मोकाशी, सचिन माळवे, दयानंद तेलंगे-पाटील, अविनाश कोंडे, धनाजी धोत्रे, नीलेश कुलथे, किशोर शिंदे, रफिक नदाफ, सागर भोसले यांच्या पथकाने ही कामगिरी केली.
चौकट:
वाहनचोरास पोलिसांनी ‘धूम’ स्टाइलने पकडले
गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीवरून, सिंहगड रस्ता पोलिसांनी ब्रह्मा हॉटेल चौकामध्ये संशयित वाहनांची तपासणी सुरू केली. दरम्यान, एक संशयित तरुण तिथून दुचाकी वरून जात असताना पोलिसांनी त्याला थांबण्याचा इशारा केला असता तो पळून जाण्याच्या तयारीत होता. मात्र पोलिसांनी त्याला ‘धूम’ स्टाइल पकडून त्याची चौकशी केली असता त्याने ती दुचाकी नवले पुलाजवळून चोरी केल्याचे सांगितले. तसेच याआधी त्याने कोंढवा पोलीस ठाण्याच्या हद्दीत १ दुचाकी व सिंहगड रस्ता पोलीस ठाण्याच्या हद्दीत ४ दुचाकी चोरल्या असल्याचेही कबूल केले. पोलिसांनी सर्व दुचाकी ताब्यात घेऊन जप्त केली आहेत.