ट्रकचा धक्का लागल्याने दुचाकीस्वार महिलेचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: September 18, 2019 06:31 PM2019-09-18T18:31:25+5:302019-09-18T18:36:08+5:30
चिंचवड येथील केएसबी चौकात हा अपघात झाला.अपघातानंतर ट्रकचालक न थांबता निघून गेला.
पुणे (पिंपरी) : वाहनाला ओव्हरटेक करणाऱ्या ट्रकचा कट लागल्याने दुचाकीस्वार महिलेचा मृत्यू झाला. तसेच अडीच वर्षीय मुलगी व वडील यात जखमी झाले. चिंचवड येथील केएसबी चौकात मंगळवारी हा अपघात झाला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रतिभा राकेश पाटील (वय २६) असे मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. तर अडीच वर्षीय उन्नती पाटील व राकेश जगन्नाथ पाटील (वय ३६, रा. जाधववाडी, चिखली) असे जखमी झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी जखमी राकेश पाटील यांनी भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात ट्रकचालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
फिर्यादी राकेश मंगळवारी पहाटे पावणे पाचच्या सुमारास त्यांची मुलगी उन्नती व पत्नी प्रतिभा यांच्यासह दुचाकीवरून कुदळवाडीकडून मोरवाडीकडे जात होते. दरम्यान केएसबी चौक येथे पुलावरील चढावरून डाव्या बाजूने फिर्यादी पाटील दुचाकी चालवित होते. त्यावेळी एका वाहनाला ओव्हरटेक करताना अज्ञात ट्रकचालकाने बेदरकारपणे वाहन चालवून फिर्यादी पाटील यांच्या दुचाकीला कट मारला. त्यामुळे पाटील व त्यांची मुलगी तसेच पत्नी दुचाकीवरून पडले. यात प्रतिभा यांच्या डोक्याला व हनुवटीला मार लागल्याने त्यांचा मृत्यू झाला. तर मुलगी उन्नती व राकेश पाटील जखमी झाले. अपघातानंतर ट्रकचालक न थांबता निघून गेला. भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक जितेंद्र गिरणार तपास करीत आहेत.