रास्त धान्य घेतल्यास मिळणार दुचाकी : एफडीओची योजना
By ऑनलाइन लोकमत | Published: February 7, 2019 07:57 PM2019-02-07T19:57:55+5:302019-02-07T20:08:42+5:30
येत्या १५ फेब्रुवारी पर्यंत ई पॉस यंत्राद्वारे धान्य खरेदी केलेल्या शिधापत्रिकाधारकांना दुचाकी आणि प्रेशर कुकर मिळण्याची संधी आहे.
पुणे : ई पॉस यंत्राद्वारे शंभर टक्के धान्य वितरण व्हावे, नागरिकांना त्याची पावती मिळावी या साठी अन्न धान्य वितरण कार्यालयाच्या (एफडीओ) वतीने भाग्यशाली सोडत काढण्यात येणार आहे. त्या अंतर्गत येत्या १५ फेब्रुवारी पर्यंत ई पॉस यंत्राद्वारे धान्य खरेदी केलेल्या शिधापत्रिकाधारकांना दुचाकी आणि प्रेशर कुकर मिळण्याची संधी आहे.
सार्वजनिक वितरण बळकट करण्यासाठी, काळाबाजाराला आळा घालण्यासाठी सरकारने संपूर्ण धान्य वितरण व्यवस्थेचे संगणकीकरण करण्याचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प २०१५ पासून हाती घेतला आहे. त्या अंतर्गत २०१७-१८ या आर्थिक वर्षामध्ये पुणे शहरामध्ये ८४० रास्त धान्य दुकानांमध्ये ई-पॉस यंत्र बसविण्यात आले. जुलै २०१७ पासून या यंत्राच्या माध्यमातूनच धान्य वितरण करण्यात येत आहे. मार्च २०१८मध्ये ई-पॉस यंत्राद्वारे ४७ टक्के धान्य वाटप होत होते. जानेवारी २०१९ अखेरीस ९१ टक्के धान्य या यंत्राच्या माध्यमातून वितरीत करण्यात येत आहे.
राज्यात दर महिन्याच्या ७ ते १५ तारखेदरम्यान अन्न सप्ताह राबविण्याचा निर्णय २०१२ साली घेण्यात आला. मात्र, अन्न सप्ताहात धान्य घेऊन जाण्याबाबत उदासिनता दिसून येत आहे. प्रत्येक महिन्याच्या १ ते १५ तारखे पर्यंत धान्य वाटप पूर्ण करणे शक्य होत नव्हते. या शिवाय ई पॉस यंत्राद्वारे धान्य वितरण करताना रास्तभाव दुकानदार ग्राहकांना पावती देत नसल्याची तक्रार करण्यात आली होती. या त्रुटी देखील दूर व्हाव्यात या उद्देशाने येत्या १५ फेब्रुवारी पर्यंत शिधापत्रिकाधारकांसाठी भाग्याशाली योजना राबविण्यात येत आहे. त्या अंतर्गत १५ फेब्रुवारी पर्यंत धान्याची उचल केलेल्या ग्राहकांना दुचाकी आणि प्रेशर कुकर मिळविण्याची संधी असेल. प्रत्येक परिमंडळ निहाय एका ग्राहकाला दुचाकी आणि प्रत्येक रास्त धान्य दुकानामागे एका व्यक्तीस प्रेशर कुकर दिला जाईल. ही सोडत ई पॉस यंत्रातील पावती क्रमांकावरुन काढली जाणार असल्याची माहिती अन्नधान्य वितरण विभागाकडून देण्यात आली.