मोटारसायकल चोरट्यांकडून ८ लाख रुपयांच्या दुचाकी ताब्यात; चाकण पोलिसांची कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Published: December 25, 2023 12:29 PM2023-12-25T12:29:19+5:302023-12-25T12:30:23+5:30
चाकण शहरात पार्किंग केलेल्या मोटारसायकल चोरीच्या प्रमाणात वाढ
चाकण : चाकण परिसरातून दुचाकी चोरीचे प्रमाण वाढल्याने पोलिसांविषयी नागरिकांचा अविश्वास बळावत चालला होता. यासाठी पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी दिलेल्या आदेशानुसार चाकण पोलीसांनी दणकेबाज कारवाई करत दोन मोटार सायकल चोरट्यांना ताब्यात घेतले आहे.
योगेश तुकाराम देवकर (वय.३० वर्षे ) दत्तात्रय गंगाराम गाडेबैल (वय.२६ वर्षे, दोन्ही रा. कवठे यमाई ता. शिरूर जि. पुणे ) यांना चाकण पोलिसांनी अटक केली असून त्यांच्याकडून आठ लाख रुपये किमंतीच्या एकुण १५ मोटारसायकल जप्त करण्यात आल्या आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चाकण शहरात पार्किंग केलेल्या मोटारसायकल चोरीच्या प्रमाणात वाढ झाल्याने चाकण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कदम यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रसन्न जऱ्हाड आणि विक्रम गायकवाड यांच्या पथकाने वाहन चोरीच्या घटनास्थळाच्या परिसरातील शेकडो सीसीटीव्ही फुटेज तपासले. तसेच सदर मोबाईलचा तांत्रिक विश्लेषन तपास करून घटनास्थळी दिसलेल्या इसमांबाबत माहिती प्राप्त करून, चाकण पोलीस पथकाने मोटार सायकल चोरी करणारे योगेश देवकर व दत्तात्रय गाडेबैल या दोघांना कवठे यमाई येथे सापळा रचुन ताब्यात घेतले. चोरट्यांनी चाकण पोलीस ठाणे व इतर पोलीस ठाणे हद्दीतून चोरी केलेल्या एकुण १५ मोटार सायकली ताब्यात घेण्यात आलेल्या आहेत.
चाकण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कदम,गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक युनुस मुलाणी,सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रसन्न जऱ्हाड,विक्रम गायकवाड,संदिप सोनवणे,राजु जाधव,हनुमंत कांबळे,निखील शेटे,नितीन गुंजाळ,सुनिल भागवत,संदिप गंगावणे, अशोक दिवटे,महेश कोळी,विवेक सानप,प्रतिक चव्हाण,अरुण शिंदे,महादेव बिक्कड,माधुरी कचाटे यांनी वरील कारवाई केलेली आहे.