सत्तरीपार असलेल्या दोघांनी सायकलवर जाऊन घेतली लस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2021 04:08 AM2021-06-04T04:08:54+5:302021-06-04T04:08:54+5:30
पुणे : ‘लहानपणापासूनच घरात सायकल असल्याने आम्ही आजही चालवतो. सायकल एक जीवनशैली आणि आमचा अविभाज्य भागच बनली आहे. आम्ही ...
पुणे : ‘लहानपणापासूनच घरात सायकल असल्याने आम्ही आजही चालवतो. सायकल एक जीवनशैली आणि आमचा अविभाज्य भागच बनली आहे. आम्ही दोघांनी लस सुध्दा सायकलवर जाऊनच घेतली. तेव्हा एका महिलेने आमचा व्हिडिओ काढला आणि तिच्या आईला दाखवून, असे ती म्हणाली. हे आमच्यासाठी खूप उत्साहवर्धक होते. पुणे पुन्हा सायकलींचे शहर व्हावे, हीच आमची इच्छा आहे अशा भावना वयाच्या ७० व्या वर्षी सायकल चालविणाऱ्या रमा डोंगरे यांनी व्यक्त केल्या.
जागतिक सायकल दिनानिमित्त त्यांनी आपल्या सायकलविषयीच्या आठवणींना उजाळा दिला. आजही ते आपल्या जाेडीदारासोबत सायकलवर फिरायला जातात. त्यांचे पती वयाच्या ७८ वर्षी सायकल चालवतात. त्यांची मुलगी उमा डोंगरे या देखील सायकलप्रेमी आहेत.
पूर्वी सायकल हेच फिरण्याचे साधन होते. त्यामुळेच तब्येत देखील निरोगी राहत असे. आज देखील गावांमध्ये ज्येष्ठ नागरिक सायकलवरच फिरतात आणि आपली कामं करतात. शहरात मात्र क्वचितच सायकल वापरतात. पण आता सायकल जनजागृती होत असल्याचे प्रमाण वाढत आहे. सायकलपटूंचे ग्रुप तयार करून ते फिरायला जात आहेत.
रमा डोंगरे म्हणाल्या, ‘‘गेली अनेक वर्षे सायकल वापरल्याने ती एक जीवनशैली बनली आहे. या वयातही मी रोज सायकल चालवते. निरोगी आयुष्याचे रहस्यच सायकल आहे. आज वाहनांची संख्या वाढली आहे. पण त्याला इंधनावर खर्च करावा लागतो. त्यामुळे प्रदूषणही होते. पण सायकलचे अनेक फायदे आहेत. मी त्यांच्यासोबत सायकल घेऊन घराबाहेर पडल्यावर त्यांचा स्टॅमिना खूप असल्याने ते पुढे जातात. ते नियमित सायकल चालवतात. पण मला घरातील कामे असतात त्यामुळे कधी-कधी जमत नाही. पण रोज काही कामानिमित्त सायकलचा वापर होतच असतो.’’
————————————————
रोज भाजीपाला आणायचे असेल किंवा जवळपास काही काम असेल तर सायकलचाच वापर करते. साधारण घरापासून चार-पाच किलोमीटरच्या परिसरात सायकल चालवते.
- रमा डोंगरे, बाणेर
---------------------