Pune Crime: एटीएम मशिनमध्ये छेडछाड करून ग्राहकांना गंडा घालणाऱ्या दोघांना बेड्या
By नितीश गोवंडे | Published: August 8, 2023 04:47 PM2023-08-08T16:47:21+5:302023-08-08T16:47:36+5:30
भारती विद्यापीठ पोलिसांनी आरोपींना अटक केली आहे...
पुणे : शहरातील विविध भागातील एटीएम मशिनसाेबत छेडछाड करुन पैसे काढत असलेल्या चाेरट्यांना पकडण्यात भारती विद्यापीठ पोलिसांना यश आले आहे. पोलिसांनी याप्रकरणी धमेंद्र श्रीशिवलाल सराेज (३०, रा.प्रतापगड, उत्तरप्रदेश) आणि साेनूकुमार जगदेव सराेज (२८, रा. उत्तरप्रदेश) या आराेपींना अटक केली आहे.
याप्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भारती विद्यापीठ पोलिस ठाण्याचे पथक गस्त घालत असताना त्यांना महाराणा प्रताप चाैक, भारती विद्यापीठ येथील एचडीएफसी बँकेच्या एटीएम मशीन जवळ दाेन संशयित व्यक्ती आढळून आले. त्यानुसार धमेंन्द्र सराेज व साेनुकुमार सराेज या दाेन आराेपींना अटक करण्यात आली. त्यांच्याकडे केलेल्या तपासात ते एचडीएफसी बँकेच्या एटीएम मशीनमध्ये छेडछाड करुन त्यावर पट्टी लावून ग्राहकांचे पैसे काढत असल्याचे निष्पन्न झाले. त्यावरुन त्यांच्या विराेधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला. दरम्यान आरोपींच्या ताब्यातून सहा हजार रुपये राेख, एटीएम मशिनमध्ये छेडछाड करण्यासाठी वापरलेली पट्टी आणि माेबाइल असा १५ हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
ही कामगिरी पोलिस उपायुक्त स्मार्तना पाटील, सहायक पोलिस आयुक्त नारायण शिरगावकर, वरिष्ठ पोलिस निरीक्षक विजय कुंभार, पोलिस निरीक्षक (गुन्हे) विजय पुराणिक, गिरीशकुमार दिघावकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक अमाेल रसाळ, पोलिस अंमलदार दिनेश वीर, याेगेश घाेडके, सचिन सरपाले, मितेश चाेरमाेले, अशिष गायकवाड, राहुल तांबे, अवधुत जमदाडे आणि मंगेश पवार यांच्या पथकाने केली.