थेऊरला नदीत बुडून दोन महिलांसह चिमुकलीचा मृत्यू : नेपाळवरुन आलेल्या कुटुंबावर काळाचा आघात
By ऑनलाइन लोकमत | Published: September 3, 2018 06:59 PM2018-09-03T18:59:48+5:302018-09-03T19:00:04+5:30
मुलीचा मृतदेह शोधण्यात यंत्रणांना यश आले असून दोन महिलांचा शोध सायंकाळपर्यंत लागलेला नव्हता.
थेऊर : येथील मुळामुठा नदीत धुणे धुण्यासाठी गेलेल्या दोन महिलांसह ४ वर्षे वयाची १ लहान मुलगी बुडून मृत्युमुखी पडल्याची दुदैर्वी घटना सोमवारी दुपारी २ वाजण्याच्या सुमारास थेऊर (हवेली) येथील स्मशानभूमीजवळ नदीपात्रात घडली. यातील मुलीचा मृतदेह शोधण्यात यंत्रणांना यश आले असून दोन महिलांचा शोध सायंकाळपर्यंत लागलेला नव्हता.
भजन भगतसिंग भूल (वय १९), चंद्रकला एकराज उर्फ राजू भूल (वय २३) व सोनिया एकराज उर्फ राजू भूल (वय ४) अशी मृत्यूमुखी पडलेल्यांची नावे आहेत. वरिष्ठ पोलीस निरीक्षक क्रांतिकुमार पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, भगतसिंग वीरबहादूर भूल (वय ६०, रा. कुंजीर कॉम्प्लेक्स, थेऊर, ता. हवेली) हे मुळचे नेपाळचे आहेत. मागील पंधरा वर्षापासून ते येथे सुरक्षा रक्षकाची नोकरी करीत आहेत. सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास त्यांची मुलगी भजन सुन चंद्रकला नात सोनिया व अनिषा (वय ११) नातू अभिषेक (वय ८) हे पाचजण कपडे धुण्यासाठी मुळामुठा नदीतीरावर स्मशानभूमीनजीक गेले होते. मिळालेल्या माहितीनुसार कपडे धूत असताना सोनिया ही अंघोळ करत होती. परंतू, पाय घसरल्याने ती पाण्यात बुडू लागली. ती बुडत असल्याचे पाहून तिला वाचवण्यासाठी भजन व चंद्रकला यांनी नदीत उडी टाकली. परंतू, तिघींनाही पोहता येत नसल्याने व त्या ठिकाणी नदीची खोली जास्त असल्याने त्या बुडाल्या. त्यांच्या समवेत नदीतीरावर असलेले अभिषेक व अनिषा हे दोघे रडत घरी आले.
त्यांनी आजोबा भगतसिंग यांना सदर प्रकार सांगितला. घडलेला प्रसंग समजताच सर्वजण पळतच नदीतीरावर आले. त्यावेळी तेथे स्थानिक ग्रामस्थांशी गर्दी झालेली होती. दुपारी सव्वातीन वाजण्याच्या सुमारास सोनिया हिचा मृतदेह हाती लागला. तिला तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले. परंतू, त्यापूर्वीच ती मयत झाली होती.घटनेची माहिती मिळताच हवेलीचे उपविभागीय पोलीस अधिकारी सुहास गरुड, पोलीस निरीक्षक क्रांतिकुमार पाटील, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक गणेश पिंगुवले यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी एनडीआरएफच्या पथकाला व अग्निशमन दलास कळविले.सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत कोणतेच आपत्ती व्यवस्थापन दल घटनास्थळी पोहचलेले नव्हते. या तिघी नेमक्या कशा वाहून गेल्या याबाबत कोणास काहीच माहीत नाही. पोलिसांनी या घटनेची अकस्मात मृत्यू म्हणून नोंद केलेली आहे. या घटनेमुळे थेऊर परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.