Pune | पुणे-सोलापूर महामार्गावर लक्झरीच्या धडकेमुळे दोन महिलांचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: January 24, 2023 07:12 PM2023-01-24T19:12:54+5:302023-01-24T19:15:01+5:30
या अपघातात एकीचा जागीच मृत्यू, तर तिच्या मावशीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला...
लोणी काळभोर (पुणे) :पुणे - सोलापूर महामार्गावर लोणी काळभोर ग्रामपंचायत हद्दीतील माळीमळा येथे रस्ता ओलांडताना लक्झरी बसने चिरडल्याने दोन महिलांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी (दि. २४) सकाळी पावणेसहाच्या सुमारास घडली. या अपघातात मुलीचा जागीच मृत्यू, तर तिच्या मावशीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.
माळीमळा येथे राहत असलेल्या आजारी वडिलांना भेटण्यासाठी त्या दोघी गुलबर्गा येथून आल्या होत्या. मुलगी सुरेखा नरसिंग घायाळू (वय ३८) व मावशी मंमादेवी सूर्यवंशी (वय ४७, दोघेही रा. खंडाळा, ता. आळंद, जि. गुलबर्गा, कर्नाटक) अशी अपघातात मृत्यू झालेल्यांची नावे आहेत.
सुरेखा घायाळू यांचे वडील तुळशीराम माणिक मुळे (वय ६५, रा. माळीमळा, लोणी काळभोर, ता. हवेली) मागील काही दिवसांपासून आजारी होते. त्यांना भेटण्यासाठी मुलगी सुरेखा घायाळू व मावशी मंमादेवी सूर्यवंशी या गुलबर्गा येथून लक्झरी बसने सोमवारी (दि. २३) निघाल्या होत्या. पहाटे त्या हडपसर येथे उतरून सव्वा पाचच्या सुमारास रिक्षा करून लोणी येथे आल्या. माळीमळा येथे पावणे सहाच्या सुमारास उतरून पुणे - सोलापूर महामार्ग ओलांडत असताना सोलापूरहून पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या एका लक्झरी बसने त्यांना धडक दिली. या अपघातात मुलगी सुरेखा घायाळू यांचा जागीच मृत्यू झाला, तर मावशी मंमादेवी सूर्यवंशी या गंभीर जखमी झाल्या होत्या. त्यांना लोणी काळभोर येथील खासगी दवाखान्यात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारदरम्यान त्यांचाही मृत्यू झाला.