नवनियुक्त पोलीस आयुक्तांचे 'कोरोना वॉरियर्स'ला आपुलकी अन् धीराचे दोन शब्द..!
By ऑनलाइन लोकमत | Published: September 24, 2020 12:03 PM2020-09-24T12:03:39+5:302020-09-24T12:04:28+5:30
हॉस्पिटल, होम क्वारंटाईन असलेल्या पोलिसांना दिला आत्मविश्वास
पुणे : नूतन पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी बुधवारी शहरातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेत असतानाच कोरोना संसर्गामुळे हॉस्पिटल व होम क्वारंटाईन होऊन उपचार घेत असलेल्या पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांशी संवाद साधला.झुम मिटिंगद्वारे संवाद साधताना त्यांनी कर्मचाऱ्यांशी आस्थेवाईकपणे विचारपूस केली.पोलीस दल हे माझे कुटुंब असून नागरिकांच्या रक्षणाबरोबरच त्यांची काळजी घेण्यासाठी आपण सदैव तयार असल्याचा आत्मविश्वास दिला. यावेळी पोलीस उपायुक्त मितेश घट्टे उपस्थित होते. घट्टे यांनी लॉकडाऊनपासून शहर पोलिसांनी केलेल्या उल्लेखनीय कामाची माहिती गुप्ता यांना दिली. शहर पोलीस दलातील १ हजार ८० पेक्षा अधिक पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना कर्तव्य बजावत असताना कोरोनाची लागण झाली आहे. त्यातील ६ जणांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. सध्या १५० पोलीस सक्रीय रुग्ण असून आयुक्तांनी त्यापैकी १३० जणांशी संवाद साधला.
त्यावेळी कोणाच्या कुटुंबामध्ये सर्व जण बाधित तर कोणी रुग्णालयातून डिस्चार्ज होऊन नुकतेच घरी परतलेले अशा सर्वांशी बोलताना कोरोना कधी झाला, उपचार व्यवस्थित चालू आहेत का?, लवकर बरे व्हा, अशी आपुलकीने विचारपूसही केली. गुप्ता यांनी केलेल्या आस्थेवाईक चौकशीमुळे अनेक कर्मचाऱ्यांना गहिवरुन आले.बरे झालेल्या कर्मचाऱ्यांच्या चेहऱ्यावरील आनंदाची छटा पाहून, कोरोना बाधित कुटुंबातील आईला जास्त त्रास देऊ नका, अशी मिस्किल टिपणीही आयुक्तांनी केली.
़़़
कुटुंबाच्या स्वास्थाला सर्वोच्च प्राधान्य देण्याचा दिला सल्ला
पोलीस कोविड योद्धांशी संवाद साधताना पोलीस आयुक्त गुप्ता यांनी आपल्या डॉक्टर बहिणीचे उदाहरण दिले. आपली डॉक्टर बहीण कोरोनाग्रस्तांच्या सेवेमध्ये व्यस्त असताना ती स्वत: देखील कोरोनाबाधित झाली आहे. त्यामुळे तिची दोन्ही मुलेही कोरोनाबाधित झाल्याची आठवण त्यांनी आवर्जुन सांगत कुटुंबाच्या स्वास्थाला सर्वोच्च प्राधान्य देण्याचा सल्ला देत असताना घरच्यांची काळजी घ्या, मुलांची काळजी घ्या असा प्रेमळ सल्लाही दिला.