अॅम्युनिशन फॅक्टरीतील स्फोटात दोन कामगारांचा मृत्यू
By admin | Published: June 15, 2017 02:21 PM2017-06-15T14:21:35+5:302017-06-15T14:23:16+5:30
खडकीतील अॅम्युनिशन फॅक्टरीत सकाळी सव्वानऊच्या सुमारास उत्पादन प्रक्रियेवेळी स्फोट झाला आहे.
Next
ऑनलाइन लोकमत
पुणे, दि. 15- खडकीतील अॅम्युनिशन फॅक्टरीत सकाळी सव्वानऊच्या सुमारास उत्पादन प्रक्रियेवेळी स्फोट झाला आहे. या स्फोटात फॅक्टरीत काम करणारे दोन कामगार जागीच ठार झाले आहेत. अशोक डुबल आणि मारिया रॉक अशी स्फोटात मृत्यू झालेल्या कामगारांची नावं आहेत. स्फोटाच्या आवाजाने खडकी परिसर सकाळी हादरून गेला होता.
भारतीय संरक्षण विभागाअंतर्गतच्या खडकी आयुध निर्माण फॅक्टरी ( दारूगोळा कारखाना ) मध्ये सकाळच्या वेळी काम सुरू असताना, दारूगोळा उत्पादन विभाग दोनमध्ये ९.२० च्या सुमारास अचानक स्फोट झाला. दोन स्फोटक वस्तू हाताळताना ही घटना घडली. ही वस्तू एका जागेवरून दुसऱ्या जागेवर घेऊन जात असताना हा स्फोट झाला. उत्पादन प्रकियेवेळी झालेल्या या अपघाताच्या दुर्घटनेत डुबल आणि रॉक हे दोन कामगार जागीच ठार झाले. या घटनेची माहिती मिळताच संरक्षण खात्याच्या अग्निशामक विभागाची वाहनं तातडीने घटनास्थळी दाखल झाली. त्यानंतर आगीवर नियंत्रण मिळविण्यात आलं.
मृत झालेले कामगार डुबल मूळचे कर्नाटकचे तर मरिया कोईमतूरच्या आहेत. डुबल यांना दोन मुले आणि एक मुलगी आहे. मारिया यांना एक मुलगा, एक मुलगी आहे. मारिया यांच्या पत्नीला हदयविकाराचा त्रास आहे, या दुर्घटनेची माहिती मिळताच, त्यांना अस्वस्थ वाटू लागलं होतं. त्यांना लगेच खडकीतील फॅक्टरी रूग्णालयात दाखल करण्यात आले. चार वर्षापुर्वी अशीच दुर्घटना फॅक्टरीत घडली होती. त्यात एका कामगाराचा मृत्यू झाला होता. तर दोन वर्षापुर्वी घडलेल्या अशाच दुर्घटनेत दापोडीत राहणाऱ्या एका कामगाराला कायमचे जायबंदी होण्याची वेळ आली होती.