कोथरुडमध्ये बांधकामाचा पाळणा तुडून दोन कामगार ठार
By ऑनलाइन लोकमत | Published: October 26, 2019 01:03 PM2019-10-26T13:03:22+5:302019-10-26T13:03:37+5:30
कोथरुडमध्ये २० मजली इमारतीला रंगकाम सुरु असताना बांधकामाचा पाळणा तुडून त्यात दोन कामगार जागीच ठार झाले आहे.
पुणे : कोथरुडमध्ये २० मजली इमारतीला रंगकाम सुरु असताना बांधकामाचा पाळणा तुडून त्यात दोन कामगार जागीच ठार झाले आहे. ही घटना कोथरुडमधील महात्मा सोसायटीच्या शेवटच्या टोकाला डोंगराजवळ बांधकाम सुरु असलेल्या ठिकाणी आज दुपारी सव्वा बारा वाजता घडली. अग्निशामक दलाची रेस्क्यू व्हॅन आणि रुग्णवाहिका घटनास्थळी रवाना झाली आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी, कोथरुडमधील महात्मा सोसायटीच्या शेवटच्या टोकाला डोंगराच्या बाजूला एका २० मजली इमारतीचे बांधकाम सुरु आहे. या इमारतीचे काम जवळपास पूर्ण झाले असून सध्या इमारतीला रंग देण्याचे काम सुरू आहे. त्यासाठी इमारतीच्या कडेने पाळणा बांधला होता. त्यावर उभे राहून दोन कामगार रंग देण्याचे काम करीत होती.
दुपारी सव्वा बारा वाजण्याच्या सुमारास हा पाळणा अचानक तुटला व त्यावरील दोन कामगार उंचावरुन थेट खाली कोसळले. उंचावरुन पडल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. अग्निशामक दलाला याची माहिती मिळताच कोथरुडची गाडी घटनास्थळी पोहोचली. इमारतीला बांधलेला पाळणा हा मध्येच अडकला आहे. तो कोसळून आणखी काही दुर्घटना होण्याची शक्यता आहे. त्यामुळे कामगारांच्या मदतीने तो खाली घेण्याचे काम अग्निशामक दलाचे जवान करीत आहेत.