दोन वर्षांच्या मुलाच्या घशात अडकला मणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 8, 2018 01:26 AM2018-08-08T01:26:37+5:302018-08-08T01:27:04+5:30
खेळण्यातील लंबगोलाकार मणी घशात गेल्याने श्वास घेण्यास त्रास होत असलेल्या दोन वर्षे वयाच्या मुलाला वाचविण्यात ससून रुग्णालयातील डॉक्टरांना यश आले आहे.
पुणे : खेळण्यातील लंबगोलाकार मणी घशात गेल्याने श्वास घेण्यास त्रास होत असलेल्या दोन वर्षे वयाच्या मुलाला वाचविण्यात ससून रुग्णालयातील डॉक्टरांना यश आले आहे. शस्त्रक्रिया करून स्वरयंत्रात अडकलेला हा दीड सेंटिमीटर लांबीचा मणी काढण्यात आला.
ससून रुग्णालयात आणले त्या वेळी या मुलाला ठसका लागत होता, तसेच श्वास घेण्यासही त्रास होत होता. या मुलाचे आई-वडील दोघेही अशिक्षित आहेत; त्यामुळे त्यांना नेमके काय होत होते, हे कळाले नाही. मुलगा भात खात असताना त्याला ठसका लागल्याने रुग्णालयात आणल्याचे त्यांनी डॉक्टरांना सांगितले. हा मुलगा रात्रभर बालरोग विभागात होता. बालरोगतज्ज्ञांनी कान, नाक, घसा तज्ज्ञ डॉक्टरांना त्याची तपासणी करण्यास सांगितले. त्यानुसार डॉ. शेफाली पवार यांनी सीटी स्कॅन केल्यानंतर श्वासनलिकेत एक लंबगोलाकार मणी अडकल्याचे दिसून आले. त्यामुळे रात्री ८ वाजता तातडीने ब्राँकोस्कोपी करण्याचा निर्णय घेतला. डॉ. माया जामकर व सहकाऱ्यांनी मुलाला तत्परतेने भूल दिली. त्यानंतर डॉ. समीर जोशी यांच्या नेतृत्वाखाली डॉक्टरांनी मुलाच्या घशातील मणी बाहेर काढला. हा मणी सुमारे दीड सेंटिमीटर लांबीचा होता.