दोन वर्षांच्या कोरोना संकटातला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2021 04:14 AM2021-08-24T04:14:21+5:302021-08-24T04:14:21+5:30

दुसऱ्या लाटेनंतरचा सर्वांत कमी ‘पॉझिटिव्हिटी’ : बाधितांचे प्रमाणही २.४६ टक्के प्रज्ञा केळकर-सिंग पुणे : ऑगस्ट महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात शहराचा ...

Two-year-old Corona in crisis | दोन वर्षांच्या कोरोना संकटातला

दोन वर्षांच्या कोरोना संकटातला

Next

दुसऱ्या लाटेनंतरचा सर्वांत कमी ‘पॉझिटिव्हिटी’ : बाधितांचे प्रमाणही २.४६ टक्के

प्रज्ञा केळकर-सिंग

पुणे : ऑगस्ट महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात शहराचा ‘पॉझिटिव्हिटी रेट’ आणखी घसरला आहे. १६ ते २१ ऑगस्ट या आठवड्यात २.४६ टक्के इतका ‘पॉझिटिव्हिटी रेट’ नोंदवला गेला. दुसऱ्या लाटेनंतरचा हा शहरातील सर्वांत कमी दर आहे. त्यामुळे पुणेकरांसाठी ही मोठी दिलासादायक बाब मानली जात आहे. सरत्या आठवड्यात ५७ हजार ५०४ इतक्या चाचण्या झाल्या. त्यापैकी १४१६ रुग्ण कोरोनाग्रस्त असल्याने निदान झाले.

मार्च-एप्रिल महिन्यात पुण्याने कोरोना रुग्णसंख्येचा उद्रेक अनुभवला. आजवरचा सर्वांत जास्त ३२ टक्के इतका ‘पॉझिटिव्हिटी रेट’ धडकी भरवणारा ठरला. मे महिन्यापासून रुग्णसंख्या कमी होऊ लागल्यावर साथीचा आलेख खाली उतरला. रुग्णसंख्या कमी होऊ लागल्याने ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून शहरातील निर्बंध शिथिल करण्यात आले.

जून-जुलैच्या तुलनेत ऑगस्टमधल्या चाचण्यांचे प्रमाण जास्त आहे. दर आठवड्याला सरासरी ५५ ते ६० हजार चाचण्या होत आहेत. दररोजच्या कोरोनाबाधितांचे प्रमाण १५०-२५० इतके आहे. त्यामुळे ‘पॉझिटिव्हिटी रेट’ ३ टक्क्यांच्या खाली आला आहे. मात्र, ‘डेल्टा’ विषाणूमुळे होणारी बाधा चिंतेची ठरत आहे. लसीचे दोन डोस घेतल्यानंतरही या विषाणूचा संसर्ग झाल्याची उदाहरणे आहेत. त्यातच ‘डेल्टा प्लस’ विषाणूचा प्रादुर्भाव डोकेदुखी बनली आहे. तिसऱ्या लाटेची भीती अद्याप पूर्णपणे संपली नाही. त्यामुळे मास्क, शारीरिक अंतर आणि स्वच्छता तसेच जास्तीत जास्त लसीकरण या चतु:सूत्रीचे पालन व्यक्तिगत व सामाजिक स्तरावर आवश्यक आहे.

चौकट

‘गणपती’च्या दिवसात सावधगिरी आवश्यक

गेल्या वर्षी मार्च ते मे या तीन महिन्यांमध्ये कोरोना साथीने जोर धरला, तर जून-जुलैत रुग्णसंख्या थोडी कमी झाली. गणेशोत्सवानंतर ऑगस्ट-सप्टेंबर महिन्यात आलेली कोरोनाची लाट मात्र धडकी भरवणारी ठरली. यंदाही आता गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर रुग्णसंख्या कमी झाली आहे. त्यामुळे धार्मिक स्थळे, नाट्यगृहे, चित्रपटगृहे वगळता सर्व व्यवसाय आणि व्यवहार पूर्ववत झाले आहेत. त्यामुळे शहरात सर्वत्र गर्दी दिसत आहे. त्यातच गणेशोत्सव दोन आठवड्यांवर येऊन ठेपला आहे. मात्र, गणेशोत्सवात विनाकारण गर्दी करून नागरिकांनी तिसरी लाट ओढावून घेऊ नये. गेल्या वर्षीची पुनरावृत्ती टाळावी, असा इशारा वैद्यकतज्ज्ञ देत आहेत.

चौक

९८ टक्के पुणेकरांनी हरवले कोरोनाला

शहरात आतापर्यंत ३० लाख ६२ हजार २४३ इतक्या चाचण्या झाल्या. त्यापैैकी ४ लाख ९१ हजार ८६२ कोरोनाबाधित असल्याचे निदान झाले. यातले ४ लाख ८० हजार ९०० रुग्ण बरे होऊन घरी गेले. कोरोनाबाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.७७ टक्के आहे. ८ हजार ८८५ कोरोनाग्रस्त रुग्णांना जीव गमवावा लागला. सध्या २०९ कोरोनाबाधितांची परिस्थिती गंभीर असून २४८ रुग्ण ऑक्सिजनवर आहेत. पुण्यातल्या सक्रिय रुग्णांची संख्या २ हजार ७७ इतकी आहे.

चौक

आठवडा चाचण्या रुग्ण पॉझिटिव्हिटी रेट

२८ जून-४ जुलै ३९,८८८ २१४८ ५.३८

५ - ११ जुलै ३८,५४३ २०७२ ५.३७

१२- १८ जुलै ४४,६९५ १८६१ ४.१६

१९-२५ जुलै ५३,९५३ १८३२ ३.३९

२६ जुलै- १ ऑगस्ट ४८,२२१ १७०५ ३.५३

२ - ८ ऑगस्ट ५६,०५७ १४८१ २.६४

९-१५ ऑगस्ट ६०,७७६ १५४४ २.५४

१६-२१ ऑगस्ट ५७,५०४ १४१६ २.४६

Web Title: Two-year-old Corona in crisis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.