महापालिका कर्मचा-यांना मिळणार दोन वर्षांची विशेष बाल संगोपन रजा
By ऑनलाइन लोकमत | Published: August 29, 2018 09:24 PM2018-08-29T21:24:45+5:302018-08-29T21:26:14+5:30
विकलांग अपत्य असलेल्या महापालिका कर्मचा-यांना देखील दोन वर्षांची विशेष बाल संगोपन रजा देण्यात येणार अाहे.
पुणे : विकलांग अपत्य असलेल्या महापालिका कर्मचा-यांना देखील दोन वर्षांची विशेष बाल संगोपन रजा देण्याचा प्रस्ताव बुधवार (दि.२९) रोजी झालेल्या महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत मंजुर करण्यात आला. याबाबत निर्णय घेण्याचे अधिकार महापालिका आयुक्तांना देण्यास देखील मान्यता देण्यात आली.
विकलांग व्यक्तींसाठी स्थापन केलेल्या राज्य समन्वय समितीची शिफारस विचारात घेऊन विकलांग अपत्य असून पत्नी नसलेल्या शासकीय पुरुष कर्मचा-याला संपूर्ण सेवेत ७३० दिवसांच्या कमाल मर्यादेत विशेष बाल संगोपन रजा मंजूर करण्याला शासनाने मंजुरी दिली आहे. त्याप्रमाणे पुणे महापालिकेच्या कर्मचा-यांना देखील ही रजा मंजूर करण्यात यावी असा प्रस्ताव बुधावारी झालेल्या सर्वसाधारण सभेच्या मान्यतेसाठी ठेवण्यात आला होतो. यामध्ये अंध, क्षीणदृष्टी, बरा झालेला कुष्ठरोग, श्रवण शक्तीतील दोष, चलन - वलन विकलांगता, मतिमंदता, मानसिक आजार असलेल्या मुलांच्या पालकांना ही रजा मिळू शकणार आहे. त्यासाठी ४० टक्के विकलांगतेचे प्रमाणपत्र आवश्यक आहे. विकलांग अपत्याच्या वयाच्या २२ वर्षांपर्यंत ही रजा घेता येईल. तसेच पहिल्या दोन अपत्यांसाठी ही रजा लागू होणार आहे. याबाबत शासनाकडून करण्यात येणा-या बदलानुसार महापालिकेच्या प्रस्तावात बदल करण्याचे अधिकार आयुक्तांना देण्यात आले.