दोन वर्षांत ३ महाघोटाळे, श्रीनाथ भिमाले यांची कबुली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 2, 2018 01:35 AM2018-10-02T01:35:31+5:302018-10-02T01:35:53+5:30
श्रीनाथ भिमाले यांची कबुली : सर्व अधिकाऱ्यांवर कडक कारवाईची मागणी
पुणे : महापालिकेच्या वतीने गेल्या दोन वर्षांत राबविलेल्या ‘पुणे कनेक्ट’, ‘एलईडी लाईट प्रकल्प’ आणि नुकताचा उघडकीस आलेला ‘डेटा करप्ट’ हे तीन महाघोटाळे झाले असल्याची कबुली महापालिकेचे सभागृह नेते श्रीनाथ भिमाले यांनी पत्रकार परिषदेत दिली. महापालिकेच्या पुणे कनेक्ट प्रकल्पामध्ये ८० लाख रुपये जादा देण्यात आले असल्याचेही त्यांनी या वेळी स्पष्ट केले आहे. याप्रकरणी जबाबदार असणाऱ्या सर्व अधिकाऱ्यांवर कडक कारवाईची मागणी भिमाले यांनी केली आहे.
तत्कालीन महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांनी आपल्या साडेतीन वर्षांच्या कार्यकाळात आणलेले अनेक प्रकल्प सध्या वादात सापडेल आहेत. यामध्ये महापालिकेचा सर्व कारभार आॅनलाईन करण्यासाठी व पारदर्शक करण्यासाठी तातडीन आलेली ‘पुणे कनेक्ट’ योजना असो, शहराची लाईट बचत करण्यासाठी आणलेली ‘एलईडी’ योजना आणि आता डेटा करप्टचे प्रकरण समोर आले आहे. यात आयटी शहर असलेल्या पुणे महापालिकेने डेटा ठेवण्यासाठी नाशिकच्या खासगी कंपन्यांकडून सुविधा घेण्यात आली होती. डेटा करप्ट झाला असून, यामुळे महापालिकेचे अंदाजपत्रक कोलमडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
महापौर मुक्ता टिळक यांच्या अध्यक्षतेखाली महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या प्रमुख उपस्थित सर्व प्रमुख अधिकारी, पदाधिकाºयांची बैठक सोमवारी घेण्यात आली. यामध्ये आयुक्तांच्या अनुपस्थित झालेल्या सर्वसाधारण सभेत जोरदार चर्चा झालेल्या डेटा करप्ट प्रकरण, कॅनॉल फुटल्याची दुर्घटना, एलईडी प्रकरणांबाबत चर्चा करण्यात आली.
या वेळी सभागृह नेते श्रीनाथ भिमाले व उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे उपस्थित होते. शहरामधील रस्त्यांवर एलइडी बसवण्याचा प्रकल्प हाती घेण्यात आला होता. याप्रकल्पा संदर्भात थेट मुख्यमंत्री कार्यालयाकडून चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. तर डेटा करप्टविषयी विरोधकांनी टीकेची झोड उठवली आहे. माहिती एका खासगी कंपनीकडे ठेवण्यात येते. हीच मुळात चुकीची गोष्ट आहे. यामुळे आर्थिक गैरव्यवहार होण्याची शक्यता आहे. टेंडर विभागाचे नियंत्रण गुजरातमधील अहमदाबाद येथील एका कंपनीकडून करण्यात येते. त्यामुळे ही माहिती चोरीला जाऊ शकते, असा आरोप विरोधकांनी केला.
भिमाले म्हणाले की, महापालिका २०१६ पर्यंत सर्व माहिती स्वत:च्या सर्व्हरमध्ये साठवून ठेवत होती. परंतु त्यानंतर ‘पुणे कनेक्ट’ प्रकल्पांतर्गत सर्व्हर भाडेतत्त्वावर घेण्यात आले. यासाठी दर महिन्याला २३ लाख ५० हजार रुपयांचा खर्च करण्यात आला. राज्य शासनाने क्लाऊड रेट कॉन्ट्रक्टचे दर ठरवून दिले असताना सुध्दा वाढीव दराने खरेदी करण्यात आली. यामध्ये करण्यात आलेले व्यवहारावर भिमाले यांनी संशय व्यक्त केला आहे. याबाबत आयुक्तांनी शासकीय अभियांत्रिकी संस्थेकडून चौकशी करण्यासंदर्भात सांगितले असल्याचे भिमाले म्हणाले.
कुणाल कुमार : राबविलेल्या प्रकल्पांवर संशय
सत्ताधारी भाजपाने या प्रकल्पावर संशयाची सुई उगारली आहे. त्यामुळे याप्रकरणात दोषी असणाºया अधिकाºयांवर कडक कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी केली आहे. तत्कालीन आयुक्त कुणाल कुमार यांच्या प्रकल्पांवर आता संशय घेण्यात येत आहे. पुणे कनेक्टचे काम तत्कालीन आयुक्तांनी त्यांच्या अधिकारामध्ये दिल्याचा आरोप करण्यात येत आहे.