धक्कादायक ! पुण्यातील भिडेपुलावर सेल्फी घेणे पडले महागात; दोन जण वाहून गेले
By ऑनलाइन लोकमत | Published: October 16, 2020 11:38 PM2020-10-16T23:38:28+5:302020-10-16T23:40:55+5:30
धरण क्षेत्रात जोरदार पाऊस होत असल्याने पाण्याचा मोठा विसर्ग सुरू...
पुणे : सेल्फी काढण्याचा मोह जीवावर देखील बेतू शकतो याचा प्रत्यय देणारी घटना सायंकाळी सहाच्या सुमारास घडली. बाबा भिडे पुलाखालील नदीपात्रात सेल्फी काढण्यासाठी उतरलेले दोन तरुण वाहून गेले. अग्निशामक दलाचे कर्मचारी अद्याप मुलांचा शोध घेत आहेत. परंतू, पाण्याचा वेग जास्त असल्याने तरुणांचा शोध घेण्यास अडथळे येत आहेत.
ओंकार तुपधर (वय १८) आणि सौरभ कांबळे ( वय २० रा. ताडीवाला रस्ता) अशी वाहून गेलेल्या मुलांची नावे आहेत. ही माहिती कळताच डेक्कन पोलीस आणि अग्निशामक दलाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. मुलांच्या कुटुंबीयांना देखील या घटनेची माहिती कळताच सर्वांनी त्याठिकाणी धाव घेतली..नातेवाईकांच्या आक्रोशाने उपस्थितांचे मन पिळवून निघाले.
उपलब्ध माहितीनुसार, धरण क्षेत्रात जोरदार पाऊस होत असल्याने पाण्याचा मोठा विसर्ग सुरू आहे.त्यामुळे मुळा मुठानदी दुथडी भरून वाहत आहे.ही दोन मुले कपड्यांची खरेदी करून भिडे पुलाजवळून जात असताना त्यांना नदी पत्रात उतरून सेल्फी काढण्याचा मोह झाला. मात्र आपला मित्र पाण्यात पडल्याचे दिसताच दुसरा मित्र त्याला वाचविण्यासाठी मदतीला धावला. परंतु पाण्याचा प्रवाह जास्त असल्याने दोघेही वाहून गेले. त्यावेळी त्यांच्या बरोबर असलेल्या तिसऱ्या मित्राने आणि नागरिकांनी पोलिसांना माहिती दिली. याप्रकरणी डेक्कन पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू आहे.
......