ट्रॅक्टर दुचाकीच्या अपघात दोन तरुण ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 4, 2021 04:08 AM2021-07-04T04:08:08+5:302021-07-04T04:08:08+5:30
जेजुरी : जेजुरीत नीरा मार्गावर ट्रॅक्टर ट्रॉली व दुचाकीची जोरदार धडक झाली. या अपघातात दुचाकीवरील दोघा युवकांचा जागीच ...
जेजुरी : जेजुरीत नीरा मार्गावर ट्रॅक्टर ट्रॉली व दुचाकीची जोरदार धडक झाली. या अपघातात दुचाकीवरील दोघा युवकांचा जागीच मृत्यू झाला. तर ट्रॅक्टर ट्रॉलीच्या बाजूला उभा असणारा एक जण गंभीर जखमी झाला आहे. हा अपघात शुक्रवारी (दि. २) रात्री ११ च्या सुमारास झाला. टॅक्टर ट्रॉलीला रिफलेक्टर नसल्याने रस्त्यावरच थांबलेल्या ट्राॅलीचा अंदाज न आल्याने हा अपघात झाला. याप्रकरणी ट्रॅक्टर चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चैतन्य संजय मुंडलिक (वय २३) आणि चैतन्य संजय नाकाडे (वय २२, दोघेही रा. जेजुरी) असे अपघातात ठार झालेल्या तरुणांची नावे आहेत. हे दोघेही दुचाकीवरून नीरा बाजूने जेजुरीकडे जात होते. जेजुरीजवळच हॉटेल पेशवाई समोरील अरुंद पुलावर खताने भरलेल्या दोन ट्रॉली असणारा ट्रॅक्टर पंक्चर झाला होता. तो महामार्गावरच उभा होता. चालक पंक्चर काढत होता. त्यावेळी अभिषेक अरविंद पांढरे (वय २६, रा बेलसर, ता. पुरंदर) याला ट्रॉलीजवळ उभे केले होते. ट्रॅक्टर ट्रॉलीला रिफ्लेक्टर नसल्याने दुचाकी चालकाला उभ्या ट्रॉली दिसल्या नाही. यामुळे त्यांची ट्रॉलीला जाऊन जोरदार धडकली. यात दोघांचाही जागेवरच मृत्यू झाला. तर ट्रॉलीजवळ उभा असलेला युवक अभिषेक पांढरे हा गंभीर जखमी झाला. जखमीला खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. पोलिसांनी या अपघातास ट्रॅक्टर चालकाने धोकादायक ठिकाणी ट्रॅक्टर उभा केला, तसेच ट्रॉलींना कोणत्याही प्रकारचे रिफ्लेक्टर नसल्याने अपघात झाला. या निष्काळजीपणाबद्दल चालक यशवंत चव्हाण याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
पुढील तपास जेजुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुनील महाडिक यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार गोविंद भोसले तपास करीत आहेत.
फोटो : १) चैतन्य मुंडलिक २) चैतन्य नाकाडे