Pune: बेकायदा पिस्टल बाळगल्याप्रकरणी दोन तरुणास अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: November 23, 2021 04:43 PM2021-11-23T16:43:23+5:302021-11-23T16:46:17+5:30
पोलिसांना बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, वडगाव बुद्रुक येथील फनटाईम थिएटरच्या पाठीमागील कॅनॉल रस्त्यावर दोन तरुण पिस्टल घेऊन थांबले आहेत...
धायरी: सिंहगड रस्ता पोलीस ठाण्याच्या हद्दीत दोघांकडून देशी बनावटीचे दोन पिस्टल व ३ जिवंत काडतुसे पोलिसांनी हस्तगत केली आहेत. याप्रकरणी दिपक ऊर्फ भैय्याजी धनाजी जगताप (वय-२६ वर्षे रा.मु.पो. रांझे ता मोर जि.पुणे व हर्षद दिलीप चव्हाण (वय २२: वर्षे सध्या रा. मु. पो. ढाकाळी पणदरे ता. बारामती जि.पुणे , मुळ पत्ता मु.पो संभाजी चौक खंडाळा ता. खंडाळा जि. सातारा) असे अटक करण्यात आलेल्या दोन आरोपींची नावे आहेत.
सिंहगड रस्ता पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुन्हे प्रतिबंधात्मक पेट्रोलिंग करत असताना पोलीस अंमलदार उज्वल मोकाशी व शंकर कुंभार यांना बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, वडगाव बुद्रुक येथील फनटाईम थिएटरच्या पाठीमागील कॅनॉल रस्त्यावर दोन तरुण पिस्टल घेऊन थांबले आहेत. पोलिसांनी लागलीच घटनास्थळी जाऊन संशयतरित्या फिरणाऱ्या दोघांची चौकशी केली असता ते पळून जावू लागले. पोलिसांनी त्याचा पाठलाग करून ताब्यात घेऊन त्यांची अंगझडती घेतली असता दिपक जगताप याच्या कंबरेच्या डाव्या बाजुस एक ४० हजार रुपये किंमतीचे पिस्टल व पॅन्टच्या डावे खिश्यात सहाशे रुपये किंमतीचे दोन जिवंत काडतुसे मिळुन आली. तसेच हर्षद चव्हाण यांच्या पॅन्टच्या डाव्या बाजुच्या कंबरेस एक तीस हजार रुपये किंमतीचे पिस्टल व उजव्या खिशात तीनशे रुपये किंमतीचे एक जिवंत काडतुस मिळुन आले. असा एकुण ७० हजार ९०० रुपये किंमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. यातील आरोपी दिपक ऊर्फ भैय्याजी धनाजी जगताप हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्यावर एकुण ४ गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत.
ही कामगिरी अप्पर पोलीस आयुक्त राजेंद्र डहाळे, पोलीस उपायुक्त पोर्णिमा गायकवाड, सहायक पोलीस आयुक्त सुनिल पवार, सिंहगड रस्ता पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक देविदास घेवारे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) प्रमोद वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक चेतन थोरबोले, पोलीस उपनिरीक्षक कुलदिप संकपाळ, पोलीस अंमलदार उज्वल मोकाशी, शंकर कुंभार, सचिन माळवे, किशोर शिंदे, सागर भोसले, इंद्रजित जगताप, सुहास मोरे, अमोल पाटील, अमित बोडरे, विकास पांडोळे, विकास बांदल, अविनाश कोंडे, देवा चव्हाण यांच्या पथकाने केली.