पाळणाघरात ठेवलेल्या चिमुकलीवर दोन तरुणांनी केला लैंगिक अत्याचार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 1, 2018 02:12 AM2018-09-01T02:12:22+5:302018-09-01T02:12:51+5:30
कोथरूड परिसरातील एका पाळणाघरात ठेवलेल्या तीन वर्षांच्या चिमुकलीवर दोन तरुणांनी लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे
पुणे : कोथरूड परिसरातील एका पाळणाघरात ठेवलेल्या तीन वर्षांच्या चिमुकलीवर दोन तरुणांनी लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी दोन मुलांसह पाळणाघर चालक महिलेवर गुन्हा करण्यात आला आहे.
याबाबत पीडित मुलीच्या आईने तक्रार दिली आहे. त्यानुसार कोथरूड पोलिसांनी तिघांच्या विरोधात बलात्कार, बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्ररादार या नोकरी करतात. त्यामुळे त्या त्यांच्या तीन वर्षांच्या मुलीला कोथरूडमधील एका घरगुती पाळणाघरात ठेवत होत्या. पाळणाघरचालक महिलेचा १७ वर्षीय मुलगा आणि त्याचा १८ वर्षांचा मित्र हे पीडित मुलीवर अत्याचार करीत होते. गेल्या काही दिवसांपासून हा प्रकार सुरू होता. पीडित मुलगी घरी गेल्यानंतर कपडे काढून झोपत होती. पालकांना हा विचित्र प्रकार वाटला. त्यामुळे त्यांनी त्या मुलीकडे चौकशी केली. त्या वेळी तिने पाळणाघर येथील दादानेच असे करायचे असल्याचे सांगितले. त्यांनी अधिक चौकशी केल्यानंतर हा धक्कादायक प्रकार समोर आला. त्यामुळे मुलीच्या पालकांनी कोथरूड पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार कोथरूड पोलिसांनी गुन्हा दाखल करत आरोपी असलेल्या अल्पवयीन मुलास ताब्यात घेतले आहे. तर, त्याच्या मित्राला अटक केली आहे. याप्रकरणी कोथरूड पोलीस अधिक तपास करीत आहेत.