इंद्रायणी नदीपात्रात बुडून दोन युवकांचा मृत्यू, शेलारवाडी जवळील कुंडमळा येथील घटना
By ऑनलाइन लोकमत | Published: May 4, 2024 02:52 PM2024-05-04T14:52:37+5:302024-05-04T14:53:07+5:30
तळेगाव दाभाडे प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. मनोज चौधरी यांनी शवविच्छेदन केल्यानंतर दोन्ही मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले....
तळेगाव दाभाडे : शेलारवाडी जवळील कुंडमळा येथे इंद्रायणी नदीपात्रात पोहण्यासाठी उतरलेल्या दोन युवकांचा पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने बुडून मृत्यू झाला. ही दुर्घटना गुरुवारी ( दि.२) सायंकाळी घडली. साजीद शरीफ बागवान (वय २०, रा. निगडी) व आतीक शरीफ बागवान (वय १५, मुळ रा. जळगाव, सध्या रा. निगडी ) अशी पाण्यात बुडून मृत्युमुखी पडलेल्या युवकांची नावे आहेत.
घटनेची माहिती मिळताच, तळेगाव एमआयडीसी पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक एस.टी. म्हस्के, हवालदार प्रशांत सोरटे, अंमलदार सुरेश जाधव,वन्यजीव रक्षक मावळ संस्थेचे संस्थापक अध्यक्ष नीलेश गराडे, प्रशांत भालेराव, गणेश गायकवाड, भास्कर माळी, अविनाश कारले, सागर भेगडे, अनिश गराडे, गणेश सोंडेकर यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांच्या जोडीला आपदा मित्र मावळ, शिवदुर्ग मित्र लोणावळ्याचे पथकही होते.
युद्ध पातळीवर शोध मोहीम राबविण्यात आली. सुमारे दीड तासांच्या अथक प्रयत्नानंतर गुरुवारी रात्री ७.३० च्या सुमारास दोन्ही मृतदेह नदीपात्रातून बाहेर काढण्यास यश आले. तळेगाव दाभाडे प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. मनोज चौधरी यांनी शवविच्छेदन केल्यानंतर दोन्ही मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. दोघांचाही फळविक्रीचा व्यवसाय होता.
इंद्रायणी नदीच्या पात्राजवळ कोणी जाऊ नये. नदीच्या पाण्यात पोहण्यास उतरू नये. सदरचे ठिकाण हे धोकादायक असून येथे बरेच पर्यटक - तरुण-तरुणींचा तोल जाऊन पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे. पाण्याजवळ जाऊन सेल्फी काढू नये. नदीचे प्रवाहामध्ये मोठे भवरे व रांजण खळले आहेत. तुमच्या घरी कोणीतरी तुमची वाट पाहत आहे याची जाण असू द्या.असे फलक तळेगाव दाभाडे पोलिस स्टेशन व तळेगाव एमआयडीसी पोलिस स्टेशनच्या वतीने लावण्यात आले आहेत.असे असूनही पर्यटक मात्र त्याकडे दुर्लक्ष करीत आहेत.