जुन्नर येथे रानडुकराच्या हल्ल्यात दोन युवक जखमी
By ऑनलाइन लोकमत | Published: October 8, 2018 09:03 PM2018-10-08T21:03:39+5:302018-10-08T21:04:32+5:30
आदिवासी भागातील आपटाळे खिंडीत भरदिवसा रानडुकरांनी अचानक केलेल्या हल्ल्यात दोन युवक जखमी झाले.
जुन्नर : आदिवासी भागातील आपटाळे खिंडीत भरदिवसा रानडुकरांनी अचानक केलेल्या हल्ल्यात दोन युवक जखमी झाले. अक्षय राजू गावडे (वय १९) व विकास किसन दुधवडे (वय २६, दोघेही रा. तेजूर, ठाकरवाडी) अशी जखमी युवकांची नावे आहेत. जखमींवर आपटाळे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात प्राथमिक उपचार केल्यानंतर त्यांना पुढील उपचारासाठी जुन्नरला नेण्यात आले आहे.
वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळाला भेट दिली असून जखमींना औषधोपचारांसाठी तातडीची मदत देण्यात आली. सोमवारी सकाळी ९.३० च्या सुमारास अक्षय व विकास दोघेही दुचाकीवरून आपटाळे खिंडीतून चालले होते. यावेळी अचानक रानडुकराने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने ते दोघेही दुचाकीवरून पडले. त्यानंतर चवताळलेल्या रानडुकराने अक्षयच्या तोंडावर धडक दिली. तसेच विकासवरदेखील हल्ला केला. भरदिवसा रानडुकराच्या हल्ल्याने परिसरातील नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे. येथील ग्रामस्थ आधीच बिबट्याच्या दहशतीने रात्रीचे घराबाहेर पडण्यास धजावत नाहीत.
रानडुकरांनी नागरिकांवर हल्ला केल्याच्या घटना फारशा कधी घडलेल्या नाहीत. रानडुकराच्या १५ ते २० च्या कळपाने शेतीचे मोठे नुकसान झाल्याच्या घटना यापूर्वी घडलेल्या आहेत. संपूर्ण पश्चिम आदिवासी भागातील शेतकरी रानडुकरांच्या उपद्रवामुळे त्रस्त असल्याचे संदीप उत्तरडे यांनी सांगितले. रानडुकरांचा कळप रात्रीच्या वेळी शेतात उतरला, की संपूर्ण प्लॉट उद्ध्वस्त करतो. त्यामुळे शेतकऱ्यांना फार मोठे नुकसान होत आहे.