Zika Virus Patient In Pune: पुण्यात प्रथमच झिकाचे २ रुग्ण; दोघांना तापासह इतर सौम्य लक्षणे

By ज्ञानेश्वर भोंडे | Published: June 25, 2024 06:06 PM2024-06-25T18:06:50+5:302024-06-25T18:08:38+5:30

झिकाच्या रुग्णांना ताप, पुरळ, डोळ्यांच्या बुबुळाच्या पुढील भागाचा होणारा दाह, अंगदुखी आणि सांधेदुखी यासारखी सौम्य लक्षणे दिसतात

Two Zika patients found for the first time in Pune Both had fever and other mild symptoms | Zika Virus Patient In Pune: पुण्यात प्रथमच झिकाचे २ रुग्ण; दोघांना तापासह इतर सौम्य लक्षणे

Zika Virus Patient In Pune: पुण्यात प्रथमच झिकाचे २ रुग्ण; दोघांना तापासह इतर सौम्य लक्षणे

पुणे : शहरात यावर्षी प्रथमच झिकाचे (Zika Virus) दाेन रुग्ण आढळून आले आहेत. खासगी रुग्णालयात प्रॅक्टिस करणा-या एरंडवण्यातील ४६ वर्षीय डाॅक्टर आणि त्याच्या १५ वर्षीय मुलीला झिकाची लागण झाल्याचे आढळून आले आहे. त्यांना तापासह इतर साैम्य लक्षणे हाेती. त्यांचा झिका पाॅझिटिव्हचा अहवाल राष्ट्रीय विषाणुविज्ञान संस्थान (NIV) कडून आलेला आहे. आता दाेघांची प्रकृती स्थिर आहे.

या डाॅक्टरला ताप आणि पुरळ यासारखी लक्षणे होती आणि त्यांच्यावर माई मंगेशकर रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यांच्या रक्ताचे नमुने १८ जून रोजी एनआयव्ही येथे पाठवण्यात आले. त्यांचा अहवाल २० जून रोजी प्राप्त झाले. त्यानंतर त्यांच्या मुलीचाही रक्ताचा नमुना २१ जून रोजी एनआयव्हीकडे तपासणीसाठी पाठवण्यात आले होता.त्यामध्ये तिलाही झिकाची लागण झाल्याचे समाेर आले असून ती सध्या घरी आहे आणि बाह्यरुग्ण विभागाच्या (ओपीडी) औषधाेपचार सूरू असल्याची माहीती महापालिकेतील आराेग्य विभागाने दिली.

झिका विषाणू हा संक्रमित एडिस एजिप्ती डासांच्या चाव्याव्दारे प्रसारित होतो. ताे डेंग्यू आणि चिकनगुनिया सारखा डासांच्या चाव्याद्वारेच प्रसारित हाेताे. झिका ची लागण झालेल्यांपैकी बहुतेकांना लक्षणे नसतात. ताप, पुरळ, डोळ्यांच्या बुबुळाच्या पुढील भागाचा होणारा दाह, अंगदुखी आणि सांधेदुखी यासारखी सौम्य लक्षणे दिसतात. गर्भवती महिलांमध्ये झिका संसर्गामुळे गर्भामध्ये मायक्रोसेफली म्हणजे मेंदुची साईज लहान हाेउ शकते. हा त्याचा प्रमुख ताेटा आहे.

दोन झिका रुग्ण आढळल्यानंतर, महापालिकेच्या आरोग्य विभाग आणि संसर्गजन्य रोग तज्ञांनी परिसराला भेट दिली. या रुग्णाचे आई-वडील, पत्नी आणि मुलगी असे पाच कुटुंबातील सदस्य असून त्यापैकी आई-वडील आणि पत्नी यांना लक्षणे आढळून आलेले नाहीत. आता पुढील १४ दिवस येथे आराेग्य विभागाकडून सर्वेक्षण करण्यात येणार आहे. काेणाला काही लक्षणे असल्यास त्यांची तपासणी करण्यात येईल. तसेच पथकाकडून कीटकनाशक फवारणी करत आहे.

महापालिकेचे सहाय्यक आरोग्य अधिकारी डॉ. राजेश दिघे यांनी ताप असलेल्या नागरिकांना जवळच्या पीएमसी रुग्णालयांना भेट देऊन झिका विषाणू संसर्गाची तपासणी करण्याचे आवाहन केले. तसेच डासांची उत्पत्ती हाेउ न देण्याचेही अवाहन केले आहे.

Web Title: Two Zika patients found for the first time in Pune Both had fever and other mild symptoms

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.