पाबळ स्मशानभूमीत जादुटोण्याचा प्रकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2021 04:09 AM2021-07-16T04:09:26+5:302021-07-16T04:09:26+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क शिक्रापूर : पाबळ (ता. शिरूर) येथील स्मशानभूमीत एक काळी पिशवी त्यावर कोहळ्याचा भोपळा, त्यावर ...
लोकमत न्यूज नेटवर्क
शिक्रापूर : पाबळ (ता. शिरूर) येथील स्मशानभूमीत एक काळी पिशवी त्यावर कोहळ्याचा भोपळा, त्यावर पिन टोचून लावलेला मुलीचा फोटो आणि लिंबू, कुंकू इतर गोष्टी वाहिलेले आढळल्याने या भागात खळबळ उडाली आहे. पाबळ येथे स्मशानभूमीत दशक्रियेसाठी आलेल्या नागरिकांना हा प्रकार दिसला. या घटनेमुळे चर्चेला उधाण आले असून हे कोणी केले असेल याबाबत चर्चा आहे.
पाबळच्या येथील एका वृद्ध महिलेच्या दशक्रियेनिमित्त ग्रामस्थ व महिला येथील स्मशानभूमीत उपस्थित होते. पाबळ ग्रामपंचायतीचे सरपंच यांच्यासह विविध संस्थेचे पदाधिकारी व ग्रामस्थ महाराजांचे प्रवचन ऐकत होते. त्याचवेळी त्यांच्या पुढे दोन फूट अंतरावर एका काळ्या पिशवीत भोपळा इत्यादी साहित्य दिसले. त्यात एका मुलीचा फोटो असल्याने तसेच त्यावर सुई टोचली असल्याने जादुटोना करण्यासाठी हा प्रकार कुणीतरी केला असल्याने सर्वांचा गोंधळ उडाला. काहींनी या घटनेचा निषेध केला. आजच्या विज्ञान युगात अजूनही अंधश्रद्धा पोसल्या जात असल्याचे वास्तव समोर आल्याची प्रतिक्रिया देताना यामागची भूमिका समजणे कठीण असल्याचे सांगून नागरिकांनी काही चुकीचे घडू नये यासाठी दक्ष राहावे तसेच या प्रकाराबाबत काही माहिती मिळाल्यास पोलिसांशी त्वरित संपर्क साधावा असे आव्हान सरपंच मारुती शेळके यांनी नागरिकांना केले.
फोटो : पाबळ ता शिरूर येथील स्मशानभूमीत सापडलेले साहित्य