पुणे-सातारा महामार्गावरील अपुऱ्या कामांमुळे पाणी साचण्याचे प्रकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2021 04:09 AM2021-06-04T04:09:33+5:302021-06-04T04:09:33+5:30
पुणे-सातारा महामार्गावरील शिंदेवाडी परिसरात तीन दिवसांपूर्वी ढगफुटीसदृश पाऊस झाल्याने महामार्गावरील सेवारस्त्यावर पूरपरिस्थिती निर्माण झाली होती. रस्त्यावर नदीप्रमाणे पाणी वाहतानाचे ...
पुणे-सातारा महामार्गावरील शिंदेवाडी परिसरात तीन दिवसांपूर्वी ढगफुटीसदृश पाऊस झाल्याने महामार्गावरील सेवारस्त्यावर पूरपरिस्थिती निर्माण झाली होती. रस्त्यावर नदीप्रमाणे पाणी वाहतानाचे चित्र पहायला मिळाले. दुपारनंतर कात्रज-शिंदेवाडी या परिसरात जोरदार पाऊस झाल्याने डोंगरमाथ्यावरील पाणी रस्त्यावर आले होते. त्यामुळे अनेक ठिकाणी पाणी साचल्याने वाहन चालवताना कसरत करावी लागत आहे. सेवारस्त्यावर जास्त पाणी आले आहे. रस्त्याचे अपुरे कामांमुळे पाणी साचत असल्याचे स्थानिक नागरिक सांगत आहेत. महामार्गावर अनेक ठिकाणी पावसाळ्यात पाणी साचते. मागील १० ते १२ वर्षांपासून सारोळा, नसरापूर, वर्वे, शिवापूर, शिंदेवाडी येथील पूल, सेवा रस्त्याची कामे अपूर्ण आहेत. त्यामुळे दरवर्षी पावसाळ्यात पावसाचे पाणी रस्त्यावर येते. मोठ्या गाड्यांमुळे पाणी अंगावर उडून दुचाकीचा अपघात होऊ शकतो.
अनेक ठिकाणी खड्डे पडले असून, संरक्षक कठडे नाहीत, सूचना फलक नाहीत, यामुळे पावसाळ्यात अपघात घडतात. शिंदेवाडी येथे सहा-सात वर्षांपूर्वी पाणी साचून चारचाकी गाडी वाहून गेली होती. त्यात मुलगी, आईचा मृत्यू झाला होता. मात्र, तरीही याकडे महामार्ग प्राधिकरण काणाडोळा करत आहे. महामार्गावरील कामे अपूर्ण असताना टोलवाढ केली आहे. त्यामुळे नागरिक नाराजी व्यक्त करीत आहेत.